चाकूच्या धाकावर दहशत माजविणाऱ्या आरोपीला अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
दीपक चौपाटी परिसर हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा बनत चालला आहे. चोरी, लुटपात, मारामारी या परिसरात नेहमीच होतांना दिसतात. भाईगिरीचा आव आणून कुणाशीही वाद घालणे, टोळक्याने येऊन मारहाण करणे, या घटना येथे नित्याच्याच झाल्या आहेत. दीपक चौपाटीला लागूनच प्रेमनगर वस्ती आहे. येथेही टपोरी युवक मोठ्या प्रमाणात हुडदंग घालतांना दिसतात. अवैधरित्या जवळ शस्त्र बाळगून शस्त्राच्या धाकावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका हातात चाकू घेऊन प्रेमनगर येथे लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. चाकूच्या धाकावर दहशत मजावितांना पोलिसांनी अटक केलेला आरोपी (२६) हा बावणे ले-आऊट एकार्जुना ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील रहिवाशी आहे.
दीपक चौपाटी परिसरातील प्रेमनगर येथे एक तरुण हातात चाकू घेऊन लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना प्रेमनगर येथे एक तरुण हातात चाकू घेऊन दहशत माजवितांना दिसला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. त्याच्या जवळून पोलिसांनी लाकडी मूठ व धारदार लोखंडी पाते असलेला चाकू जप्त केला. ज्याची संपूर्ण लांबी १३ सेमी, लोखंडी पात्याची लांबी ९ सेमी व पात्याची मध्यभागाची रुंदी १.२ सेमी एवढी आहे. तसेच त्याच्या जवळील एक डिस्कव्हर मोटारसायकल (MH ३४ BT ४६९९) असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सार्वजनिक ठिकाणी चाकूच्या धाकावर लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी तरुणावर पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर, एपीआय धिरज गुल्हाने व पोलिस पथकाने केली.
Comments
Post a Comment