प्रशांत चंदनखेडे वणी
नगर पालिका प्रशासनाकडून मालमत्ता व पाणीकरावर अवाढव्य व्याजदर व दंड आकारण्यात येत असल्याने नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. करधारकांवर भरमसाठ व्याजदर व दंड आकारला जात असल्याने सर्वसामान्य करधारक कमालीचे चिंतेत आले असून त्यांना नगर पालिकेचा कर भरणे जड जाऊ लागले आहे. त्यामुळे नगर पालिकेने क्षमतेपेक्षा जास्त व्याजदर आकारून सर्व सामान्य करधारकांकडून पठाणी वसुली करू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे. नगर पालिकेने सर्वसामान्य करधारकांवर अतिरिक्त व्याजदर व दंड आकाराने बंद न केल्यास नगर पालिका प्रशासनाविरुद्ध दंड थोपटण्याचा इशारा मानवी हक्क सुरक्षा परिषद वणीच्या वतीने देण्यात आला आहे. तसे निवेदनही न. प. प्रशासनाला देण्यात आले आहे.
नागरिकांनी वेळेत मालमत्ता व पाणीकर न भरल्यास नगर पालिका त्या करावर पेनाल्टी लावते. तसेच भरमसाठ व्याजदर आकारून सक्तीने कर वसुली केली जाते. नगर पालिकेच्या या इंग्रज कालीन सक्त लगान वसुलीने शहरवासी चांगलेच काळजीत आले आहेत. पाणी व मालमत्ता करावर आकारण्यात येणाऱ्या अवाढव्य व्याजदरामुळे नागरिकांना कर भरणे कठीण जाऊ लागले आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर भरण्याचे फर्मान नगर पाकिकेकडून जारी करण्यात आले आहे. मात्र अतोनात व्याजदर व दंड आकारून हाती दिलेल्या कर पावत्या पाहून नागरिक चक्रावले आहेत. नगर पालिकेची ही पठाणी कर वसुली नागरिकांना चिंता सागरात लोटू लागली आहे. करापोटी व्याजासह आकारण्यात आलेली ही भरमसाठ रक्कम भरणे नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. मात्र संगणक प्रणालीतील सॉफ्टवेअरमुळे व्याजाची रक्कम व दंड कमी करता येणार नाही, असे उलट उत्तर नगर पालिकेच्या कर विभागाकडून मिळवू लागले आहे.
मालमत्ता व पाणीकरावरील व्याजदर व दंड कमी न केल्यास सर्वसामान्य नागरिकांना कर भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच नगर पालिकेने व्याज माफीचा ठराव घेऊन यावर कायमचा तोडगा काढणेही गरजेचे झाले आहे. मालमत्ता व पाणीकरावर भरमसाठ व्याजदर व दंड आकारून नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादणे नगर पालिकेने बंद न केल्यास नगर पालिका प्रशासनाविरोधात दंड थोपटण्याचा इशारा मानवी हक्क सुरक्षा परिषद वणीच्या वतीने न.प. प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतांना मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू धावंजेवार, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, जिल्हा संपर्क प्रमुख सुमित्रा गोडे, तालुका महिला अध्यक्ष सुनिता काळे, महिला शहर अध्यक्षा प्रमिला चौधरी, सुरेश बन्सोड, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य परशुराम पोटे, वामनराव कुचनकर, संदीप बेसरकर, ज्ञानेश्वर बोनगिरवार, अमोल कुमरे आदी उपस्थित होते.
No comments: