राजूर (कॉ) येथील वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी पतसंस्थेत लाखोंचा अपहार, अध्यक्ष व सचिवांसह चार जणांवर गुन्हे दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील राजूर (कॉ) येथील वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी पतसंस्थेत लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचे उघडकीस आल्यानंतर लेखा परीक्षकांनी पोलिस स्टेशनला नोंदविलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा विद्यमान व तत्कालीन लिपिकावर पतसंस्थेत १ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनीही पतसंस्थेतील ग्राहकांच्या ठेवी परस्पर गहाळ केल्याचे उघड झाले आहे. वेकोलि कर्मचाऱ्यांनी भविष्याची पुंजी म्हणून या पतसंस्थेत जमा केलेला पैसा या चौघांनीही संगनमत करून गहाळ केला.
वेकोलि कर्मचाऱ्यांनीच उभी केलेली ही पतसंस्था असल्याने मोठ्या विश्वासाने कर्मचाऱ्यांनी या पतसंस्थेत पैशाची गुंतवणूक केली होती. परंतु पतसंस्थेच्या अध्यक्ष व सचिवानेच पैशाची अफरातफर केल्याने कर्मचाऱ्यांच्या विश्वासला मोठा तडा गेला आहे. सुकर भविष्याकरिता विश्वासाहर्तेने या पतसंस्थेत वेकोलि कर्मचाऱ्यांनी आर्थिक गुंतवणूक केली होती. परंतु अध्यक्ष, सचिव व लिपिकांनी ठेवीदारांच्या ठेवींमध्ये अपहार करून कर्मचाऱ्यांच्या भविष्याची वाट खडतर केली आहे. या पतसंस्थेच्या संचालक मंडळात सर्व वेकोलि कर्मचारीच असल्याने मोठ्या विश्वासाने या पतसंस्थेत कर्मचाऱ्यांनी आपल्या श्रमाचा पैसा गुंतविला होता. परंतु संचालक मंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे अध्यक्ष व सचिवाने मोठा आर्थिक घोळ केला. यात पतसंस्थेतील तत्कालीन व विद्यमान लिपिकानेही हात धुवून घेतले.
वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी पतसंस्था मर्या. राजूर ही वेकोलि कर्मचाऱ्यांची पतसंस्था म्हणून ओळखली जाते. या पतसंस्थेच्या संचालक मंडळातही सर्व वेकोलि कर्मचारीच आहेत. मात्र १ एप्रिल २०१८ ते २१ मार्च २०२४ या कालावधीत पतसंस्थेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप जानबा टेंबुर्डे, सचिव रमेश मोतीराम कनोजिया, लिपिक संजय अर्जुन शेटीया व तत्कालीन लिपिक मदन कृष्णाजी अंडुस्कर या चौघांनी पतसंस्थेतील ठेवी परस्पर गहाळ केल्या. पतसंस्थेत १ कोटी २७ लाख ९ हजार ८०१ रुपयांचा अपहार करून ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. या पतसंस्थेत वेकोलि कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली होती. मात्र पतसंस्थेच्या अध्यक्ष, सचिव व दोन लिपिकांनी त्यांच्या पैशाची अफरातफर केली. त्यामुळे या पतसंस्थेत लाखोंच्या ठेवी असलेले ग्राहक कमालीचे चिंतेत आले आहेत.
पतसंस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना पतसंस्थेत आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार होते. त्यामुळे त्यांनी पतसंस्थेच्या सीसी कर्ज खात्यातील रक्कमा परस्पर विड्रॉल केल्या. त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बनावट चेकच्या साहाय्याने वेळोवेळी रक्कमा काढल्या. आणि त्या रक्कमा कॅशबुकला जमा न करता परस्पर गहाळ केल्या. पतसंस्थेत लाखो रुपयांचा अपहार करून आरोपींनी आपला आर्थिक लाभ करून घेतला. ठेवीदारांच्या ठेवींमध्ये अफरातफर करून चारही आरोपींनी पतसंस्थेचे मोठे आर्थिक नुकसान केले. त्यामुळे तालुका लेखापरीक्षक अभय वसंतराव निकोडे यांनी पतसंस्थेत १ कोटी २७ लाख ९ हजार ८०१ रुपयांचा अपहार करणाऱ्या दिलीप जानबा टेंबुर्डे, रमेश मोतीराम कनोजिया, संजय अर्जुन शेटीया, मदन कृष्णाजी अंडुस्कर यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी या चारही आरोपींवर बीएनएसच्या कलम 406, 409, 420, 467, 468, 471, 34, 120 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास ठाणेदार गोपाल उंबरकर करीत आहेत.
No comments: