प्रशांत चंदनखेडे वणी
श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील श्रीराम जन्मोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरातून आकर्षक सजावट व जिवंत देखाव्यांनी नटलेली भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून शहरात शोभायात्रेची ही परंपरा कायम आहे. श्रीराम नवमी उत्सव समिती कडून श्रीराम जन्मोत्सव व शोभायात्रेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत डोळ्याचे पारणे फेडणारे अकल्पित देखावे साकार केले जातात. यावर्षी "हरियाणातील लाईव्ह हनुमान" या शोभायात्रेत पाहायला मिळणार आहे. आणि हा जिवंत देखावा या शोभायात्रेचे खास आकर्षण असणार आहे. वेगवेगळ्या वेशभूषाही या शोभायात्रेत साकारल्या जाणार आहेत. भक्ती आणि संस्कृतीचं विलोभनीय दर्शन या शोभायात्रेतून भाविकांना याच देही याच डोळा घडणार आहे. या शोभायात्रेत श्रीराम विराजमान असलेल्या वेशभूषेतील रामरथ साकारण्यात येणार आहे. तसेच अयोध्येतील रामल्लाची देखणी मूर्ती, श्रीकृष्ण, शंकरजी आणि हनुमान यांच्या मूर्ती या शोभायात्रेचे आकर्षण राहणार आहेत. तसेच श्री गजानन महाराज देवस्थान शेगावची भजन मंडळी आपल्या भजनांनी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार आहे.
त्याचबरोबर या शोभायात्रेत रामरथ, रामपालखी, घोडे, विविध बँड पथके तसेच आकर्षक सजावट केलेल्या वेगवेगळया पालख्या शोभायात्रेचे आकर्षण वाढविणार आहेत. ६ एप्रिलला श्रीराम जन्मोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून शहरातून निघणारी भव्य दिव्य शोभायात्रा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी राहणार आहे. चौकाचौकात रांगोळ्यांची सजावट करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्रीराम रथाचे पूजन केल्यानंतर शोभायात्रेला सुरवात होईल. ही शोभायात्रा शहरातील श्रीराम मंदिरापासून (जुनी स्टेट बँक) निघेल. शहरातील प्रमुख मार्गांनी भ्रमण करीत ही शोभायात्रा परत श्रीराम मंदिर येथे पोहचल्यानंतर या शोभायात्रेचा समारोप होईल. या शोभायात्रेत रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केले आहे.
No comments: