प्रशांत चंदनखेडे वणी
धावत्या वाहनासमोर स्वतःला झोकून देत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना १ एप्रिलला रात्री ११ .३० वाजताच्या सुमारास घडली. मयूर बंडू सोनटक्के (१५) रा. नायगाव (खुर्द) ता. वणी असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वहिनीने उपदेशाचे सुनावलेले बोल मयूरने चांगलेच मनावर घेतले. अशातच रात्री १० वाजता तो रागातच घराबाहेर पडला. आणि बसस्थानकाजवळ येऊन त्याने स्वतःला धावत्या वाहनासमोर समोर झोकून दिले. अज्ञात वाहनाखाली चिरडल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत संदीप पांडुरंग सोनटक्के यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
वणी तालुक्यातील नायगाव (खुर्द) येथे कुटुंबासह राहत असलेला संदीप हा १० वीचा विद्यार्थी होता. त्याची नुकतीच १० वीची परीक्षा संपली होती. तो नेहमी मोबाईल पाहण्यात गुंग राहायचा. मित्र मंडळी सोबत जास्त वेळ घालवायचा. रात्री उशिरापर्यंत घरी यायचा नाही. त्यामुळे त्याच्या वहिनीने त्याची कान उघाडणी केली. वहिनीने खडेबोल सुनावल्याने त्याने ते चांगलेच मनावर घेतले. वहिनीने रागावल्याचा राग मनात धरून तो तेवढ्याच रात्री घराबाहेर पडला. नायगाव फाट्यावरील बसस्थानकाजवळ येऊन त्याने धावत्या वाहनासमोर स्वतःला झोकून दिले. वाहनाखाली तो अक्षरशः चिरडल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. बसस्थानकाजवळ रोडच्या बाजूला मयूरची चप्पल दिसून आली, व रोडवर त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. नंतर ही माहिती पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी शीघ्र घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
मयूरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलेली हकीकत व घटनास्थळावरील एकूणच परिस्थिती वरून मयूरने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. याबाबत संदीप सोनटक्के यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मयूरला योग्य वळण लागावी या उद्देशाने वहिनीने सुनावलेले बोलही मयूरच्या जिव्हारी लागले. तरुणांना थोडं काही बोललं तरी ते टोकाचे निर्णय घेतात. त्यामुळे पालकवर्गाच्या चिंता वाढल्या आहेत. मयूर वाईट वळणावर जाऊ नये म्हणून वहिनीने त्याला समजावले. मात्र तोच राग मनात धरून त्याने आत्मघात केला. शुल्लक गोष्टी वरून मयूरने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबं प्रचंड हादरलं आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: