उत्पादन शुल्क विभागाच्या बेफिकिरीमुळे शहरात जोमात सुरु आहे अवैध दारू विक्री, पोलिसांची दोन अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात खुलेआम अवैध दारू विक्री सुरु असतांना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षातून अवैध दारू विक्री वाढत असल्याचे दिसून येत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारात अनियमितता असल्याने अवैध दारू विक्रीला वाव मिळत असल्याचे बोलले जात आहे. अवैध दारू विक्रेत्यांनी वर्दळीच्या चौकांसह शहरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्रीचे अड्डे थाटले असून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी निव्वळ कार्यालयात बसून राहत असल्याचे दिसून येत आहे. परंतु पोलिस मात्र अवैध दारू विक्रेत्यांची पाळेमुळे शोधून काढत आपलं कर्तव्य बजावत आहेत. पोलिसांनी गणेशपूर रोड व टागोर चौक येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या दोन्ही अवैध दारू विक्रेत्यांकडून ४१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही १ एप्रिलला दुपारी करण्यात आली.
पोलिसांना गणेशपूर रोड व टागोर चौक येथे अवैध दारू विक्री सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता आरोपी हे अवैधरित्या दारू विक्री करतांना आढळून आले. पोलिसांनी टागोर चौक व गणेशपूर रोड येथे अवैध दारू विक्रीचे अड्डे थाटून राजरोसपणे दारू विक्री करणाऱ्या दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक केली. सदानंद अशोक पथाडे (२४) रा. केसुर्ली व हर्षल राकेश खरे (२०) रा. रंगनाथ नगर अशी या पोलिसांनी अटक केलेल्या अवैध दारू विक्रेत्यांची नावे आहेत. त्यांच्या जवळून पोलिसांनी रॉयल चॅलेंज कंपनीच्या १८० मिलीच्या ४८ शिश्या किंमत ९ हजार १२० रुपये, ओल्ड मंक कंपनीच्या १८० मिलीच्या ४८ शिश्या किंमत ६ हजार ९६० रुपये आणि जुनी वापरती दुचाकी (MH २९ S ८४६) किंमत २५ हजार रुपये असा एकूण ४१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही आरोपींवर मदकाच्या कलम ६५(अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस शिपाई गजानन कुडमेथे, अमोल अन्नेरवार, आकाश अवचारे यांनी केली.
No comments: