थरार, भटक्या कुत्र्याचा बालकावर हल्ला, महिला धावून आल्याने टळला पुढील प्रसंग

प्रशांत चंदनखेडे वणी 

भटक्या कुत्र्याने एका बालकावर हल्ला चढविल्याचा थरारक व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाला आहे. परिसरात सायकल फिरवून खेळत असलेल्या बालकावर अचानक भटक्या कुत्र्याने हल्ला केला. बालकाला अक्षरशः या कुत्र्याने सायकलवरून खाली खेचले. त्याच्या शरीराला या कुत्र्याने चावा घेतल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे. हा पिसाळलेला कुत्रा बालकाचे लचके तोडत असतांना त्याच्या किंचाळ्या ऐकून एक महिला धावतच घराबाहेर आली. तिने कुत्र्याला हाकलून लावल्याने पुढील प्रसंग टळला. ही अंगावर शहारे आणणारी घटना शहरातील सदाशिव नगर येथे ११ मार्चला सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

शहरात भटक्या कुत्र्यांचा हौदोस प्रचंड वाढला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एका व्यक्तीला भटक्या कुत्र्याने कडाडून चावा घेतला होता. हे प्रकरण युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी डोळ्यासमोर आणले होते. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची त्यावेळी जोरदार मागणीही करण्यात आली होती. शहरात कुत्र्यांची संख्या वाढीस लागली आहे. गल्लीबोळात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात संचार करतांना दिसतात. कुठे कुठे तर भटक्या कुत्र्यांचे कळप पाहायला मिळतात. रात्री जोरजोरात भुंकणे, पादचाऱ्यांच्या अंगावर चवताळणे, दुचाकीच्या मागे धावणे, हा या भटक्या कुत्र्यांचा नित्यक्रम झाला आहे. नगर पालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम काही दिवसांपूर्वी राबविली होती. परंतु कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती आणखी झपाट्याने वाढू लागली आहे. ही भटकी कुत्री आता माणसांवर हल्ला करू लागल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. 

शहरातील सदाशिव नगर येथे तेथीलच एक बालक रस्त्याने सायकल फिरवून खेळत होता. तेवढ्यात रस्त्याने जाणाऱ्या एका भटक्या कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. कुत्रा बालकावर अक्षरशः तुटून पडला. बालकाला सायकलवरून खाली खेचत हा कुत्रा त्याच्या शरीराचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत असतांनाच बालकाचे ओरडणे ऐकून शेजारी राहणारी महिला धावतच घराबाहेर आली. तिने कुत्र्याला हाकलून लावल्याने बालक गंभीर जखमी होण्यापासून बचावला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून कुत्र्याने बालकावर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ शहरात तुफान वायरल होत आहे. बघणाऱ्यांच्या अंगावर शहरे येईल असा हा व्हिडिओ आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी