प्रशांत चंदनखेडे वणी
भरधाव ऑटो चक्क महिलेच्या अंगावरच उटल्याची खळबळजनक घटना शुक्रवार दि. ७ मार्चला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शहरातील घरसंसार सेल जवळ घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला आधी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नंतर तिला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. ही महिला घरसंसार सेल मधून बाहेर पडत असतांना वर्दळीच्या ठिकाणावरून सुसाट ऑटो चालविण्याऱ्या ऑटो चालकाचे ऑटो वरील नियंत्रण सुटले, व ऑटो थेट महिलेच्या अंगावरच पलटी झाला. महिला ऑटोखाली दबल्याने तिला जबर मार लागला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी महिलेला रुग्णालयात हलविले व ऑटो चालकाला पकडून त्याचा खरपुच समाचार घेतला. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरती रामदास दख्खनकर वय अंदाजे ४५ वर्षे रा. रंगारीपुरा असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
घरसंसार सेलमध्ये वस्तूंची खरेदी केल्यानंतर ही महिला सेल मधून पायऱ्या उतरून बाहेर पडत नाही तोच धूम ऑटो चालकाचे ऑटो वरील नियंत्रण सुटले, व ऑटो चक्क महिलेच्या अंगावरच उलटला. ऑटो चालकांच्या मनमानी व निष्काळजीपणे ऑटो चालविण्याने निष्पापजीवांचे बळी जाऊ लागले आहेत. शहरातील रस्त्यांवर ऑटो चालकांची सर्कस पाहायला मिळते. एवढेच नाही तर शहरातील रस्तेच ऑटो चालकांनी काबीज केल्याचे दिसून येत आहे. ऑटो चालकांची मुजोरी प्रचंड वाढली असून त्यांना कुणाचीही भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करून आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पेलणारी ही महिला बेधुंद ऑटो चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघातग्रस्त झाली आहे. तिच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आल्यानंतर तिला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी ऑटो चालकाला अटक केली असून अपघातास कारणीभूत ठरलेला ऑटोही (MH २९ V ७६२९) ताब्यात घेतला आहे. तसेच ऑटो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: