प्रशांत चंदनखेडे वणी
सुसाट दुचाकीची घरासमोरील रस्त्यावर खेळणाऱ्या एका चार वर्षाच्या बालिकेला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. ५ मार्चला रात्री ८ वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील चिचघाट येथे घडली. चुटकी उर्फ अंकिता प्रविण वाघाडे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत वडील प्रविण गजानन वाघाडे (३९) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी चालक हा दुचाकी वरून दारूची अवैध वाहतूक करीत असल्याचे तक्रारकर्त्या वडिलांचे म्हणणे आहे. अवैध विक्री करीता देशी दारूचा साठा घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराने सुसाट व बेजाबदारपणे दुचाकी चालवून घरासमोर खेळणाऱ्या बालिकेचा बळी घेतला. त्यामुळे गावकऱ्यांमधून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. या अपघातामुळे काही काळ तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली होती.
चिचघाट येथे वास्तव्यास असलेल्या प्रविण वाघाडे यांची चार वर्षांची मुलगी घरासमोरील रस्त्यावर सवंगड्यांसोबत खेळत होती. याच दरम्यान घोन्सा कडून बोपापूरकडे जाणाऱ्या सुसाट दुचाकीने (MH २९ CE ५५४६) बालिकेला उडविले. यात बालिका गंभीर जखमी झाली. दुचाकीस्वाराने बालिकेला धडक दिल्यानंतर तिच्या सोबत खेळणाऱ्या मुलांनी किंचाळ्या फोडल्या. मुलांच्या किंचाळ्या ऐकून चिमुकलीचे वडील घरातून धावतच बाहेर आले. मुलीला मोटारसायकलने धडक दिल्याचे पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी चुटकीवर उपचार केल्यानंतर तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मात्र चुटकी रात्री आई जवळ झोपली असतांना पहाटे ३ वाजता आईला जाग आल्यानंतर चुटकी कुठलीच हालचाल करीत नसल्याचे आईला जाणवले. आईने लगेच चुटकीच्या वडिलांना चुटकी हालचाल करीत नसल्याचे सांगितले. वडिलांनाही तिची हालचाल बंद पडल्याचे दिसल्यानंतर काळजाचा तुकडा काळाने हिरावून घेतल्याचे वडिलांच्या लक्षात आले. मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने चुटकीला मुका मार लागला होता. तो असह्य झाल्याने चुटकीचा झोपेतच मृत्यू झाला.
प्रविण वाघाडे यांनी ही माहिती नंतर मुकुटबन पोलिसांना दिली. पोलिस तात्काळ चिचघाट येथे प्रविण वाघाडे यांच्या राहत्या घरी पोहचले. शारीरिक हालचाल बंद पडलेल्या चुटकीला डॉक्टरांकडून तपासून घेण्याकरिता पोलिसांनी तिला झरीजामणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी चुटकीला तपासून मृत घोषित केले. चुटकीला धडक देणाऱ्या दुचाकी चालकाचे नाव व पत्ता प्रविण वाघाडे यांनी त्याला विचारून ठेवला होता. त्यामुळे त्यांनी मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकाविरुद्ध मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अविनाश भिमराव मरसकोल्हे (२९) रा. बग्गी अकोली ता. केळापूर याच्या विरुद्ध बीएनएसच्या कलम २८१, १०६(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
No comments: