महसूल विभाग व शिरपूर पोलिसांची पैनगंगा रेती घाटांवर संयुक्तिक कार्यवाही, अन्य रेती घाटांवरही अशाच कार्यवाहीची अपेक्षा
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुका रेती तस्करीचा हॉसस्पॉट बनला आहे. तालुक्यात रेती तस्करांचं जाळं दूरवर पसरलं आहे. रेती तस्करांनी आपली पाळंमुळं याठिकाणी घट्ट केली आहेत. रेती तस्करीला रोख लावण्यात प्रशासन अपयशी ठरू लागल्याने तस्करांना येथे सुगीचे दिवस आले आहेत. रेती तस्करीतून अनेक छोटे मोठे तस्कर मालामाल झाले आहेत. राजकीय पाठबळातूनही मागील अनेक वर्षांपासून रेती तस्करी जोमात सुरु आहे. रेती तस्करीच्या अवतीभोवती राजकारण फिरत असल्याने प्रशासनाला मुके, बहिरे व आंधळेपणाचं सोंग घ्यावं लागतं. मात्र थोडं धाडस करून महसूल विभागाने शिरपूर ठाणेदारांची मदत घेऊन पैनगंगा नदीच्या रेती घाटांवर सर्च मोहीम राबवली. रेती तस्करांवर कार्यवाहीचा बडगा उगारून रेती चोरी करणाऱ्या एका ट्रॅक्टरसह रेती घाटांच्या आजूबाजूला साठवून ठेवलेली १५ ते २० ब्रास रेती जप्त करण्यात आली. जप्त केलेली रेती घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आली आहे.
पैनगंगा नदीच्या साखरा व कोलगाव रेती घाटांवरून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याची माहिती कानावर पडल्याने शिरपूर पोलिस व महसूल विभागाने संयुक्तिक कार्यवाही मोहीम राबविली. या दरम्यान रेती घाटावरून एक ट्रॅक्टर चोरीची रेती वाहून नेतांना आढळून आला. रेती चोरी करणारा ट्रॅक्टर व १ ब्रास रेती असा एकूण ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल या कार्यवाहीत जप्त करण्यात आला. तसेच रेती घाटांच्या आजूबाजूला तस्करांनी अवैधरित्या साठा करून ठेवलेली १५ ते २० ब्रास रेतीही यावेळी जप्त करण्यात आली. ही जप्त केलेली रेती घरकुलधारकांना देण्यात आली. शिरपूर पोलिस व महसूल विभागाने संयुक्तरित्या राबविलेल्या या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात का होई ना तस्करांचे धाबे दणाणले आहेत. बेकायदेशीरपणे रेतीचा उपसा करून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करांवर बीएनएसच्या कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारची कार्यवाही मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत व वर्धा नदीच्या रेती घाटांवरही करण्यात यावी, अशी अपेक्षा येथील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
No comments: