डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मैत्री कट्टा ग्रुप द्वारा आयोजित उत्सव स्त्रीत्वाचा..! ध्यास समानतेचा...!!
प्रशांत चंदनखेडे वणी
मैत्री कट्टा ग्रुप मारेगाव द्वारा उत्सव स्त्रीत्वाचा..! ध्यास समानतेचा...!! या सदराखाली जागतिक महिला दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून खास महिलांसाठी सांस्कृतिक व पारंपरिक मेळ घातलेल्या भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यात दडलेले कलागुण त्यांना उत्स्फूर्तपणे सादर करता यावे, याकरिता मैत्री कट्टा ग्रुप त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतं. यावर्षी महिलांना समानतेच्या शिखरावर नेणाऱ्या घटनाकाराच्या जयंती निमित्त खास महिलांना समर्पित असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दाराचा उंबरठाही कधी ओलांडता न आलेल्या महिलांना देशाची सूत्रे हाती घेण्याइतपत कायदेशीर अधिकार मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांना महिलांनी खऱ्या अर्थाने आदर्श मानावा, हा दृष्टिकोन बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमा मागचा आहे. बाबासाहेबांनी पुरुषी गुलामगिरीतून महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर त्यांच्यातील आंतरिक कलागुणही त्यांना स्वातंत्र्यपणे प्रकट करता यावे, या उद्देशाने मैत्री कट्टा ग्रुप सातत्याने महिलांना प्रेरित करणारे कार्यक्रम आयोजित करीत असते.
थोर कायदेपंडित, समाज सुधारक, बहुजनांचे मुक्तिदाते, दूर दृष्टिकोन ठेवणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मैत्री कट्टा ग्रुप मारेगाव द्वारा १२ व १३ एप्रिलला महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ एप्रिलला सकाळी ११ वाजता १८ वर्षावरील महिलांसाठी विदर्भ स्तरीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यात व देशात वर्षानुवर्षांपासून पारंगत असलेला पेहराव महिलांना परिधान करायचा आहे. उत्कृष्ठ वेशभूषेला प्रथम (५०००), द्वितीय (३०००), तृतीय (२०००) आणि चतुर्थ (१०००) अशा प्रकारचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता ३० वर्षावरील महिलांसाठी विदर्भ स्तरीय सामूहिक व एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता देखील आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सामूहिक नृत्य स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस ११००० रुपये. द्वितीय ९००० रुपये व तृतीय बक्षीस ७००० हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तर एकल नृत्य स्पर्धेकरिता पाहिलं पारितोषिक ७००० हजर रुपये, दुसरं पारितोषिक ५००० हजार रुपये व तिसरं पारितोषिक ३००० हजार रुपये देण्यात येणार आहे.
१३ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता ढोल ताशाच्या गजरात भव्य सांस्कृतिक महिला रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व मानवजातीला पाणी पिण्याचा सामान अधिकार आहे, अशी गर्जना करतांनाच दलितांनाही सन्मानाने पाणी पिता यावं, यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्यांनी दलितांना पाणी पिण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेला महाडचा तो चवदार तळे सत्याग्रह त्यावेळची ऐतिहासिक क्रांती ठरली. बाबासाहेबांनी केलेल्या त्याच ऐतिहासिक सत्याग्रहाची हुबेहूब दृश्य या रॅलीत साकारण्यात येणार असून हे दृश्य या रॅलीचं खास आकर्षण राहणार आहेत. या रॅलीत जनतेने हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोकांनी केले आहे. तसेच महिलांच्या सन्मानार्थ समर्पित सर्व कार्यक्रमांनाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तथा महिलांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहनही मैत्री कट्टा ग्रुप कडून करण्यात आले आहे. महिलांना या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरिता प्रतिभा दाखरे(9922669648), विना हेपट(9356035463), मयुरी जैस्वाल(7066006684) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
No comments: