Latest News

Latest News
Loading...

पुढल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा घेण्याचा नक्कीच विचार करू, खासदार प्रतिभा धानोरकर

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी हा क्रीडा संस्कृतीने पारंगत असलेला तालुका आहे. येथील क्रीडाप्रेमी जनतेने क्रीडा संस्कृतीचे जतन केले आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर हे देखील क्रीडाप्रेमी होते. ते खासदार असतांना त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वरोऱ्यापासून भव्य कबड्डीचे सामने आयोजित केले. त्यांच्याच पाऊलखुणांवर पुढे चालत यावर्षी वणी येथेही भव्य कबड्डीचे सामने घेण्यात आले. भविष्यात या मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात अशाच प्रकारे कबड्डी सामने घेण्याचा मानस असून ही परंपरा आता अखंडितपणे सुरु ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वणीत यावर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मिळालेला प्रेक्षक व महाराष्ट्रातून आलेल्या संघांचा प्रतिसाद बघता पुढल्या वर्षी वणीत राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा घेण्याबाबत नक्कीच विचार करू, असे प्रतिपादन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. त्या शासकीय मैदानावर आयोजित खासदार चषक स्पर्धेच्या (राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा) बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. त्यांच्याच संकल्पनेतून यावर्षी वणी येथे खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, एसडीपीओ गणेश किंद्रे, तहसिलदार निखील धुळधर, तालुका क्रीडा अधिकारी चैताली राऊत,  बीडीओ किशोर गज्जलवार, न.प.मुख्याधिकारी सचिन गाडे, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे, काँग्रेसचे टिकाराम कोंगरे, संजय खाडे, दिलीप मालेकर, घनश्याम पावडे, अलका महाकुलकर, शामा तोटावार, प्रमोद लोणारे, मोरेश्वर पावडे, भाउराव कावडे, जय आबड, वंदना आवारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शासकीय मैदानावर तीन दिवस कबड्डी स्पर्धेचा हा थरार रंगला. महाराष्ट्रभरातील कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. अतिशय रोमांचक असे कबड्डीचे सामने खासदार चषकात अनुभवायला मिळाले. मुंबई, नागपूर, बारामती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर यासारख्या महानगर व मोठमोठ्या जिल्ह्यातुन कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आले होते. मॅटवर खेळण्यात आलेल्या या कबड्डी सामन्यांना प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या बसण्याचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. चित्तथरारक अशा झालेल्या अंतिम सामन्यात श्रीराम कबड्डी संघ बारामतीने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर संघाचा पराभव करून खासदार चषक आपल्या नावे केला. तर नागपूर संघ उपविजेता ठरला. 

तिसऱ्या स्थानासाठी टाकळी येथील संदीप बुरेवार व भारत स्पोर्टींग क्लब उमरेड यांच्यात सामना रंगला. यात टाकळी संघाने उमरेड संघावर रोमहर्षक विजय मिळविला. त्यामुळे उमरेड संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रथम विजेत्या संघाला रोख १ लाख रुपये, उपविजेत्या संघाला ७१ हजार रुपये, तिसरे स्थान पटकावणाऱ्या संघाला ५१ हजार रुपये व चौथ्या स्थानावरील संघाला ३१ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. या व्यतेरिक्त प्रत्येक संघातील उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला वयक्तिक बक्षिसेही देण्यात आली. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पहापळे, सचिव योगेंद्र शेंडे, प्रवीण काकडे, ओम ठाकूर, पलाश बोढे , मुरलीधर भोयर, सतिश लडके, राजू अंकतवार, नरेश मोरस्कर, गणेश आसुटकर, देवानंद अवताडे, उमेश कुमरे, नरेंद्र सपाट, सुरेश डाहुले यांच्यासह युवा नवरंग क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.



No comments:

Powered by Blogger.