Latest News

Latest News
Loading...

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा शिवसेनेकडून (उबाठा) जाहीर निषेध

प्रशांत चंदनखेडे वणी 

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेकऱ्यांविषयी खेदजनक वक्तव्य केल्याने त्यांचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होत असतांना वणी येथेही शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने मंत्री महोदयांच्या या शेतकरी विरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना कृषिमंत्र्यांची जीभ घसरली. त्यांनी बेताल वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेना (उबाठा) प्रचंड आक्रमक झाली. त्यांनी कृषिमंत्र्यांविरोधात तीव्र निदर्शने देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका शेतकऱ्याने कर्ज माफीबाबत विचारणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल्याचे शेतकऱ्याने म्हटले. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची तरी कर्ज माफी होईल काय, असा प्रश्न शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना विचारला. यावर कृषिमंत्री कोकाटे चांगलेच भडकले. ते थेट शेतकऱ्यावरच बरसले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रतिक्रिया देतांना त्यांची जीभ घसरली. त्यांच्या या शेतकरी विरोधी वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या खेदजनक वक्तव्यामुळे शिवसेना (उबाठा) चांगलीच आक्रमक झाली. शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात तीव्र निदर्शने देण्यात आली. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचीही मागणी शिवसेनेकडून (उबाठा) करण्यात आली आहे. 

या निषेध आंदोलनात शिवसेनेचे संजय निखाडे, संतोष माहुरे, डिमन टोंगे, सुधीर थेरे, राजू तुराणकर, मनोज ढेंगळे, प्रशांत पाचभाई, पुरुषोत्तम बुट्टे, प्रकाश कऱ्हाड, अजय चन्ने, दुष्यन्त उपरे, विनोद उप्परवार, अशोक पंधरे, संतोष कुचनकर, विनोद ढुमणे, मनीष बत्रा, बंडू टोंगे, भगवान मोहिते, संजय देठे, जगन जुनगरी, राजू गोलाईत, सचिन पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं वक्तव्य 

शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना मंत्री महोदय म्हणाले की, शेतकरी कर्ज घेतात आणि ते माफ होण्याची पाच ते दहा वर्ष वाट बघतात. जोपर्यंत कर्ज माफ होत नाही तोपर्यंत वाट बघतात आणि कर्जफेड करीत नाही. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशाचं ते काय करतात, शेतीत एका रुपयाची तरी गुंतवणूक आहे का. शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा. त्यांच्या या वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. 

No comments:

Powered by Blogger.