प्रशांत चंदनखेडे वणी
वणी नगर परिषदेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ "सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची" स्थापना करण्यात आली आहे. ५ एप्रिलला या केंद्राचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते या सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय देरकर हे होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर नामफलकाचे अनावरण करण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे व उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के याच्या संकल्पनेतून हे उपजीविका केंद्र साकार झाले आहे.
या कार्यक्रमाला न.प. मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, प्रमोद निकुरे, विभाग प्रमुख पौर्णिमा शिरभाते, क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर, यवतमाळ शहर स्तर संघाच्या अध्यक्षा नीलिमा भैसारे, पांढरकवडा शहर स्तर संघाच्या अध्यक्षा दुर्गा अन्नेरवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
वणी शहरातील गरीब लाभार्थ्यांचे जीवनमान उंचाविणे व त्यांना उपजीविकेची शाश्वत साधने उपलब्ध करून देणे, यासाठी शहरात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने शहरातील गरीब उत्पादक व ग्राहक यांची सांगड घालणे तथा शहरी गरिबांना माहिती आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यासाठी सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच याला स्त्री पंख युनिट असे नामविधान करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांचे बँक खाते उघडणे, सामाजिक विकास योजनांची माहिती देणे, विविध प्रशिक्षण आयोजित करणे, रोजगाराविषयी माहिती देणे, वस्तू व उत्पादन नोंदणी करणे, विविध शासकीय योजनांतर्गत निर्माण होणाऱ्या संधी बाबत माहिती देणे तसेच विविध सेवा व वस्तू सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी महत्वपूर्ण कामे करण्यात येणार आहेत.
उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी सोनचिरैय्या केंद्र स्थापन करतांना आलेल्या शासकीय व प्रशासकीय अडचणी विशद करतांनाच त्या अडचणी कशाप्रकारे दूर केल्या याबद्दल आपल्या प्रास्ताविकातून माहिती दिली. तसेच या केंद्राच्या स्थापनेमागचा उद्देश काय व भविष्यात या केंद्राची वाटचाल कशी राहील याबाबतही विस्तृत माहिती दिली. यावेळी क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर यांनी शहर स्तर संघाची वाटचाल व सोनचिरैय्या केंद्राची स्थापना करतांना आलेली आव्हाने यावर आपल्या मनोगतातून कटाक्ष टाकला.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित महिलांना संबोधित केले. महिला या कुटुंबाचा प्रमुख धागा आहेत. महिलांची चिकाटी, जिद्द, कष्ट करण्याची क्षमता आणि काम करण्याची सचोटी ही फार मोठी असल्याचे विचार बोदकुरवार यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच त्यांनी या केंद्राच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छाही दिल्या.
आमदार संजय देरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शहरातील गरजू व गरीब महिलांना सर्वोतपरी मदत करून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना आणि खाद्य पदार्थांना बाजारपेठ करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून अशा दर्जेदार वस्तूंचे उत्पादन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
न. प. मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी नगर परिषद अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आणि बचत गटांच्या महिलांनी निर्माण केलेल्या मालाची खरेदी करण्याचे आवाहन वणीकर जनतेला केले. तसेच शहरांतर्गत सेवा देणाऱ्या सर्वांनी या केंद्रामध्ये नोंदणी करण्यासही त्यांनी सांगितले. या माध्यमातून नागरिकांना सर्व लाभ मिळेल आणि त्यांची गैरसोयही होणार नाही. वस्तू व सेवा पुरविण्याकरिता आणखी मोठ्या प्रमाणात नगर पालिकेच्या माध्यमातून याची सुरवात करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी आश्वासित केले.
विभाग प्रमुख ऍड. पौर्णिमा शिरभाते यांच्या विशेष सहकार्यातून हे शहर उपजीविका केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन उत्तम हापसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विनोद मनवर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सोनाली तिवारी, रुणाली मस्के, दुर्गा विरूळकर, मनजित कौर, प्रिया मेश्राम, रमा नयनवार, वर्ष लाकडे, वंदना काकडे, शामली सहारे, शारदा दोरखंडे, तृप्ती माळीकर, किरण शिरनाथ, रंजना भांडारवार, छाया जांभुळकर, ममता मेंगावार, आदींनी परिश्रम घेतले.
No comments: