प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील दीपक चौपाटी परिसरातील करण बियरबार जवळ सार्वजनिक खुल्या मैदानावर सुरु असलेल्या झेंडी मुंडी नावाच्या जुगारावर पोलिसांनी कार्यवाही करून झेंडी मुंडीवर पैशाचा जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही १० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता करण्यात आली.
करण बियरबार जवळ सार्वजनिक खुल्या मैदानावर झेंडी मुंडी नावाचा जुगार भरविण्यात आला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे एका टेबलवर ठेवलेल्या फ्लॅक्स बोर्डवरील वेगवेगळ्या चित्रांवर पैशाची बाजी लावून चार गोट्यांनी खेळणारा हा झेंडी मुंडी नावाचा जुगार खेळतांना लोकांची मोठी गर्दी आढळून आली. काही इसम लोकांकडून पैसे घेऊन झेंडी मुंडी नावाच्या जुगारावर पैशाची हरजीत खेळतांना आढळून आल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याठिकाणी धाड टाकली. पोलिसांनी धाड टाकताच झेंडी मुंडी खेळणारे जुगारी सैरावैरा पळत सुटले. तर पाच जण पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी झेंडी मुंडी नावाचा जुगार खेळणाऱ्या या पाचही आरोपींना रंगेहात अटक केली.
शंकर गणपत धंदरे (५८) रा. रामपुरा, सय्यद परवेज सय्यद तनवीर (२२) रा. रंगनाथ नगर, अरुण गंगाधर पामपट्टीवर (५९) रा. गणेशपूर ता. वणी, हुसैन वामन आत्राम (३०) रा. ढाकरी ता. वणी, कवडू गणपत कांबळे (८३) रा. लालगुडा ता. वणी अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या जवळून झेंडी मुंडीचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पाचही आरोपींवर मजुकाच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या आदेशावरून एपीआय धिरज गुल्हाने, सपोनि रत्नपारखी तथा पोलिस पथकाने केली.
No comments: