Latest News

Latest News
Loading...

अवैध दारू विक्रेते एलसीबी पथकाच्या रडारवर, पथकाने अवैध दारूचा मोठा साठा केला जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

गुन्हेगारी वर्तुळावर वचक ठेवण्यात आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावण्यात प्रमुख भूमिका वठविणाऱ्या यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. दिग्रस येथील दुहेरी खून प्रकरणातील आरोपींचा शोध लावण्यात शहर पोलिसांना पूर्ण सहकार्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आता अवैध दारू विक्रेत्यांच्या कुंडल्या शोधण्याचं काम हाती घेतलं आहे. एलसीबी पथकाने पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विकणाऱ्यांच्या कुंडल्या तयार केल्या असून एका अवैध दारू विक्रेत्यावर कार्यवाही देखील केली आहे. एलसीबी पथकाने अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून केलेल्या या धडक कार्यवाहीत ७९ हजार ९२५ रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. ही कार्यवाही १२ एप्रिलला करण्यात आली.

आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी एलसीबी पथकाला अवैध धंद्यांवर विशेषतः अवैध दारू विक्रेत्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एलसीबी पथक पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालून अवैध दारू विक्री, वाहतूक व दारूचा साठा करणाऱ्यांसंदर्भात माहिती गोळा करीत असतांना त्यांना पांढरकवडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सायखेडा (जुना) गावात एका इसमाने अवैध विक्री करीता घरात दारूचा साठा करून ठेवला असल्याची खात्रीदायक माहिती खबऱ्यांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने सायखेडा (जुना) या गावात राहणाऱ्या बजरंग रुपसिंग चव्हाण (२५) याच्या घराशेजारी असणाऱ्या एका पडक्या घराची झडती घेतली असता तेथे देशी दारूचा मोठा साठा आढळून आला. बजरंग चव्हाण या अवैध दारू विक्रेत्यानेच अवैध विक्री करीता हा दारूचा साठा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर एलसीबी पथकाने त्याला अटक केली. तसेच त्याने पडक्या घरात करून ठेवलेला देशी दारूचा साठाही एलसीबी पथकाने जप्त केला.

या कार्यवाहीत एलसीबी पथकाने देशी दारूच्या २३०० शिश्या असा एकूण ७९ हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपी बजरंग चव्हाण याच्यावर मदाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्थागुशा पोलिस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अजय कुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, नरेश राऊत एलसीबी पथक यवतमाळ यांनी केली.  


No comments:

Powered by Blogger.