प्रशांत चंदनखेडे वणी
रेती घाटांवरून सर्रास रेतीची तस्करी सुरु असून तालुक्यात वाळू माफियाराज आल्याचं दिसून येत आहे. राजकीय पाठबळ व महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळू माफियांना तालुक्यात सुगीचे दिवस आले आहेत. कारवाईतील उदासीनता वाळू माफियांमध्ये निर्भीडता निर्माण करण्यास कारणीभूत ठरली आहे. रेती तस्करी भोवती फिरणाऱ्या राजकारणामुळे महसूल विभागानेही अर्थकारणातच धन्यता मानण्याचं काम केलं. त्यामुळे तस्करांना तालुक्यात रान मोकळं झालं. रेती तस्करांच्या मायाजाळात अडकून चुप्पी साधण्यात आल्याने वाळू माफियांच्या हिंमती वाढत गेल्या. तस्करांना कार्यवाहीची भीतीच न उरल्याने त्यांनी रेती तस्करीचा सपाटाच लावला. मात्र आता रेती तस्करीचा प्रचंड बोभाटा झाल्याने महसूल विभाग रेती तस्करांवर कार्यवाहीचा तोरा दाखविताना दिसत आहे. रेती तस्करीत वणी उपविभाग हा प्रचंड चर्चेत आला आहे. येथे वाळू माफियांचं निर्माण झालेलं साम्राज्य चर्चेचा विष बनल्याने महसूल विभाग कुंभकरणी झोपेतून जागा झाला आहे. महसूल विभाग रेती तस्करांवर कार्यवाही करण्यास पुढे सरसावल्याने तस्कर बुचकळ्यात सापडले आहेत. तहसीलदार स्वतः ऍक्शन मोडवर आल्याने मागील काही दिवसांत रेती तस्करांवरील कारवाया वाढल्या आहेत. मंगळवार १५ एप्रिलला तहसीलदारांनी आणखी एका रेती तस्करी करणाऱ्या ट्रकवर कार्यवाही करून ट्रक तहसिल कार्यालयासमोर लावला आहे.
शासन कायदेशीरपणे रेतीघाट सुरु करण्याच्या विचारात नसल्याने शासनाच्या महसुलावर चोरटे डल्ला मारू लागले आहेत. बेकायदेशीरपणे रेतीचा उपसा करून रेतीची सर्रास अवैध वाहतूक केली जात आहे. रेती भरलेले हायवा ट्रक शहरातील रस्त्यांवरून वाहतूक करतांना दिसतात. बांधकामाच्या ठिकाणी रेतीचा मोठा साठा दिसून येतो. काळ्या बाजारात सहज रेती उपलब्ध होतांना दिसत आहे. अवाढव्य भाव आकारून तस्कर बांधकाम धारकांना रेती पुरवत आहेत. यात मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न भंगले आहे. रेती घाटांवर रात्रीच्या खेळाबरोबरच आता दिवसाचेही खेळ रंगू लागले आहेत. रेती तस्करांनी नदी पात्रातून बेसुमार रेतीचा उपसा केला आहे. रेती तस्करीतून तस्कर व त्यांचे पाठीराखेही मालामाल झाले आहेत. मात्र आता वणी उपविभागातील रेती तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महसूल विभागाकडून तस्करांवर कार्यवाहीचा बडगा उगारण्यात आला आहे. शेलू गावाजवळ अवैध रेतीघाट तयार करून वर्धा नदीपात्रातून रेतीचा उपसा व रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तहसिदारांनी स्वतः रेतीघाटावर जाऊन कार्यवाही केली. आणि एक पोकलॅन्ड मशीन व एक हायवा ट्रक जप्त केला.
या धडक कार्यवाहीनंतर १५ एप्रिललाही तहसीलदारांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक (MH ४० Y ८९९१) पकडला. वणी वरोरा मार्गावरील टर्निंग पॉईंट बियरबार जवळ सापळा रचून तहसीलदारांनी चोरीची रेती वाहून नेणाऱ्या ट्रकवर कार्यवाही करून ट्रक तहसील कार्यालयासमोर लावला. या ट्रकमध्ये ५ ब्रास रेती असून कार्यवाहीत यादव नामक तस्कराचे नाव पुढे आले असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे. मात्र हा ट्रक कोणत्या रेती घाटातुन रेती भरून आला, हे अद्याप अस्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु वर्धा नदीच्या राळगाव रेती घाटातुन हा ट्रक रेती भरून आल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. रेतीची चोरटी वाहतूक करतांना काही दिवसांपूर्वी याच ट्रक मालकाचा एक ट्रक महसूल विभागाने जप्त केल्याचेही बोलले जात आहे. वर्धा नदीच्या राळगाव रेती घाटावरून रेतीची वाहतूक सुरु असून यातूनच तस्कर रेती चोरीचाही डाव साधून घेत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे रेती तस्करांचे मनसुबे उधळून लावण्याकरिता महसूल विभाग सज्ज झाला असून स्वतः तहसीलदार निखिल धुळधर हे ऍक्शन मोडवर आल्याने रेती तस्करीला जरब बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
No comments: