प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंद, उत्साह व जल्लोषात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमही घेण्यात आले. राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जयंती दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्याकरिता शहरवासीयांनी सकाळपासूनच त्यांच्या पुतळ्याजवळ गर्दी केली होती. सायंकाळी शहरातील बहुतांश वार्डातून त्यांच्या जयंती निमित्त वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत आकर्षक सजावटींसह दैदिप्यमान देखावेही साकारण्यात आले होते. जयभीमच्या जयघोषाने आसमंत निनादला होता. यावर्षी निघालेल्या भव्य दिव्य मिरवणुकीने वणीकरांचे लक्ष वेधले. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेली ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहचल्यानंतर बुद्ध वंदनेने मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी प्रत्येक वार्डातील प्रमुखांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला. जयंती दिनी महामानवाला मानवंदना देण्याकरिता त्यांच्या पुतळ्याजवळ जनसमुदाय उमळला होता. मिरवणुकही शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. सामाजिक व राजकीय संघटनांकडून प्रत्येक चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात भीम जयंती उत्साहात
रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साह व जल्लोषात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन वणी द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. मागील ३० ते ३५ वर्षांपासून रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याठिकाणी झेंडा रोवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्यावर आधारित कार्यक्रम घेण्याची सुरु केलेली परंपरा आजही अखंडितपणे सुरु आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी पंचशील झेंड्याजवळ धुमधडाक्यात साजरी करण्यात येते. १३ एप्रिलला मध्यरात्री १२ च्या ठोक्यानंतर केक कापून व एकमेकांना केक भरवून फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. १४ एप्रिलला दुपारी १२ वाजता जयंतीचा मुख्य सोहळा आयोजित केला जातो. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करण्यात येतो. सर्वप्रथम उपस्थित अनुयायांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला हारार्पण व दीप प्रज्वलन करून पंचशील ध्वजाचे ध्वरोहण करण्यात येते. त्यानंतर बुद्ध वंदना घेतली जाते. नंतर महिलांकडून उत्स्फूर्तपणे बुद्ध भीम गीते गायली जातात. दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात येते. त्यानंतर सायंकाळी पंचशील झेंड्याजवळून डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेतात.
घटनाकाराची जयंती साजरी करण्याकरिता समाजबांधवांबरोबरच बहुजनवर्गही उत्स्फूर्तपणे सहकार्य करतो. आर्थिक योगदान देतानाच शारीरिक श्रमही घेतो. सर्वच समाजातील नागरिकांच्या आर्थिक योगदानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते. राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील लोकांकडून मिळणाऱ्या आर्थिक सहकार्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याला हातभार लागतो. त्याचप्रमाणे सर्व समाजातील व्यावसायिकही बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याकरिता सढळ हाताने मदत करतात. त्यामुळे सामाजिक सलोखा आजही तेवढ्याच निष्ठेने जपला जात असून सामाजिक मतभेद कुठेही दिसून येत नाही. सर्वच जाती धर्माचे लोक आजही गुण्यागोविंदाने नांदतात, कुणीही कुणाच्या जातीधर्माविषयी तिरस्कार ठेवतांना दिसत नाही.
मानकी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मानकी ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी उत्साहात करण्यात आली. सरपंच कैलास पिपराडे यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील सौ. मिनाक्षी मिलमीले, ग्रामपंचायत सदस्या सौ. नलिनी मिलमीले, परशुराम पोटे, अंगनवाडी सेविका सौ बेबीताई मालेकर, सुनीता पत्रकार, प्रदिप मालेकर, अविनाश सरवर, अमर खुसपुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राजूर ग्रामपंचायत कार्यालय येथे व्याख्यान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंती निमित्त राजूर ग्रामपंचायत कार्यालयात व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी व पीएचडी स्कॉलर पल्लवी जगदीश दारुंडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य अशोक वानखेडे हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विद्या पेरकावार, पोलिस पाटील वामन बलकी, वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस आस्वले, तलाठी सुनिल कोरडे, ग्रामपंचायत अधिकारी पुरुषोत्तम फुलझेले, जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश निरे, ग्रा. प. सदस्य दीपाली सातपुते, वंदना देवतळे, मंजुषा सिडाम, चेतना पाटील, सुचिता पाटील, पायल डवरे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व त्यांना मानवंदना देऊन कार्यक्रमाला सुरवात झाली.
त्यानंतर व्यख्यानाचा कार्यक्रम सुरु झाला. प्रमुख वक्ते ऍड. कुमार मोहरमपुरी यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित व गुलामीचं जीवन जगणाऱ्या समाजाच्या उत्थानासाठी आजीवन संघर्ष केला. बहिष्कृत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ते आयुष्यभर झटले. राज्यघटनेतही त्यांनी मागासवर्गीयांना विशेष अधिकार दिले. सर्व जाती धर्माच्या लोकांना सामान वागणूक मिळावी, अशी त्यांनी राज्यघटनेत तरतूद केली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे सर्वांना समान न्याय मिळाला आहे. राज्यघटनेने दिलेल्या न्याय, हक्क व अधिकारांचं जतन करण्याकरिता बहुजनांनी एकजूट असणं गरजेचं आहे. नाही तर विषमतेची दरी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
पीएचडी स्कॉलर पल्लवी दारुंडे या आपल्या व्याख्यानात म्हणाल्या की, देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेने कृषी, रोजगार, महिला सक्षमीकरण व शिक्षण यावर भर दिला पाहिजे. कारण सामाजिक विषमतेची पाळेमुळे ग्रामीण भागात खोलवर रुतलेली असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबडकरांचे विचार जनमानसांत रुजविले पाहिजे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी विशेष अधिकार प्राप्त करून दिले आहेत. या अधिकारांचा उपयोग करून महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जगदीश दारुंडे यांनी केले. कार्यक्रमाला प्राथमिक केंद्र अधिकारी व कर्मचारी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यंशासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत कर्मचारी सुमित खोब्रागडे, सुलतान व रुख्माबाई यांनी सहकार्य केले.
No comments: