Latest News

Latest News
Loading...

मुलीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून कुटुंबीयांनी घातला राडा


प्रशांत चंदनखेडे वणी 

घराशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबातील तरुण व तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांनी प्रेमविवाह केला. मात्र मुलीने प्रेमविवाह केल्याची खंत तिच्या कुटुंबियांना सतत जाणवत होती. मुलीने आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कुटुंबीयांचा विरोध पत्करून मुलीने प्रेमविवाह केल्याची खद त्यांच्या मनात खदखदत होती. त्यामुळे प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांशी त्यांचा सतत वाद व्हायचा. अशातच १५ एप्रिलला वादाची ठिणगी उडली व दोन कुटुंबांमध्ये प्रचंड राडा झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले. त्यामुळे झालेल्या मारहाणीबाबत तरुणाच्या बहिणीने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील रंगनाथ नगर येथे एकमेकांच्या घराशेजारी राहणारे तरुण तरुणी प्रेमात पडले. प्रेमातून त्यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी २० दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला. मात्र मुलीने कुटूंबियांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केल्याने कुटुंबात नाराजीचा सूर उमटत होता. मुलीने कुटुंबाला अंधारात ठेऊन प्रेमविवाहासारखा निर्णय घेतल्याने त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मुलीच्या या निर्णयाने कुटुंबं प्रचंड विचलित झालं. त्यांच्या संतापाला पारावार उरला नव्हता. मुलीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून दोन कुटुंबांमध्ये सतत वाद उत्पन्न होऊ लागले. अशातच १५ एप्रिलला रात्री १० वाजता त्यांच्यात वादाची ठिणगी उडली. दोन शेजाऱ्यांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वाद विकोपाला जाऊन दोन कुटुंबांमध्ये प्रचंड राडा झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या कुटुंबियांना चांगलंच बदडलं. आधी मुलीची आई व तरुणाच्या वाहिनीमध्ये वाद झाला. मुलीच्या आईने तरुणाच्या वाहिनीचे केस ओढून तिला थपडा बुक्क्यांनी मारहाण केली.

वहिनीला मारहाण होत असल्याचे पाहून तरुणाची बहीण, दोन भाऊ व आई मध्यस्थी करण्यास गेले. मात्र त्यांनाही मुलीच्या दोन भावांनी ओढाताण करून मारहाण केली. साहिलने हर्षलला लाकडी फाट्याने पाठीवर मारले. तर सुजल याने सिद्धांतच्या नाकावर बुक्का मारला. त्यामुळे सिद्धांतच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. सुजलने नाकावर बुक्का मारल्याने सिद्धांत जखमी झाला. तसेच मुलीच्या कुटुंबातील महिलांनी तरुणाच्या आई, बहीण व वहिनीला केस ओढून थापडा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच साहिल व सुजलने तरुणाच्या बहिणीला घरात घुसून मारण्याची व हातपाय तोडण्याची धमकी दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या तरुणाच्या बहिणीने सरळ पोलिस स्टेशन गाठून मुलीच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार नोंदविली. कु. रक्षा (काल्पनिक नाव) हिच्या तक्रारी वरून पोलिसांनी मुलीच्या कुटुंबातील एकूण सहा जणांवर बीएनएसच्या कलम 115(2), 118(1), 189(2), 189(4), 190, 191(2), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.  

No comments:

Powered by Blogger.