प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून एकाच दिवशी दोन आत्महत्यांच्या घटना घडल्याने तालुका हादरला आहे. तालुक्यातील पुरड (पुनवट) येथील एका तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तर चिखलगाव येथील एका इसमाने घरातच गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. या दोन्ही आत्महत्यांच्या घटना १८ एप्रिलला उघडकीस आल्या.
तालुक्यातील चिखलगाव येथील रहिवाशी असलेल्या संभा बापूराव निकोडे (५५) यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ एप्रिलला सकाळी उघडकीस आली. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी राहत्या घरीच नैराशेतून गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. कुटुंबातील सदस्य जेंव्हा घरी परतले तेव्हा त्यांना संभा निकोडे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
दुसरी आत्महत्येची घटना शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पुरड (पुनवट) येथे १८ एप्रिलला दुपारी उघडकीस आली. पुरड येथे कुटुंबासह राहत असलेल्या तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून मृत्यूला कवटाळले. कु. पायल बालाजी उरकुडे (२५) असे या गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. आई वडील शेतात गेल्यानंतर तिने घराच्या आड्याला ओढणीने गळफास लावला. आई वडील शेतातून घरी परतले तेंव्हा त्यांना पायल ही घराच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मुलीने गळफास घेतल्याचे पाहून आई वडिलांना चांगलाच धक्का बसला. पायलने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंब प्रचंड हादरलं आहे. आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पायलने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. परंतु तिच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: