Latest News

Latest News
Loading...

सुसाट वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले, चक्रीवादळाप्रमाणे होता वाऱ्याचा वेग, टिनपत्रे उडाली, झाडे कोलमडली, विजेची तारं तुटली

प्रशांत चंदनखेडे वणी 

उन्हाळा तापू लागल्याने उष्णतेने जीव कासावीस होऊ लागला असतांनाच निसर्गाने कूस बदलली. उष्णतेचे चटके सहन करणाऱ्या नागरिकांना भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अनपेक्षितपणे अनुभव आला. चक्रीवादळासारखा वाऱ्याचा वेग पाहून वणीकरांची चांगलीच भंबेरी उडाली. सुसाट वारा आणि कोसळणाऱ्या जलधारा हे निसर्गाचं भयावह रूप उरात धडकी भारावणारं होतं. पालापाचोळा उडतो तशी घरावरील टिनपत्रे उडाली. काही घरांचे तर छतचं उडाले. झाडं कोलमडली, विद्युत तारा तुटल्या. वादळी पावसाचा सर्वात मोठा फटका बसला तो रंगनाथ स्वामी जत्रेला. जत्रेतील दुकानांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येते. वादळी पावसाचा बैल बाजारालाही मोठा फटका बसला आहे. 

सूर्य आग ओकत असतांनाच अचानक सायंकाळी ५ वाजतानंतर निसर्गाचं रूप बदललं. ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि सुसाट्याचा वारा सुटला. वेगवान वारा वाहू लागल्याने शहरात एकच धांदल उडाली. नागरिक मिळेल तेथे आश्रय घेऊ लागले. रस्त्यांनी मार्गक्रमण करणारे नागरिकही सैरवैर झाले. स्वतःचा बचाव करण्याकरिता ते सुरक्षित आडोसा शोधू लागले. तुफानात अडकलेल्या नागरिकांना प्रसंगी मालवाहू वाहनाखाली आश्रय घ्यावा लागला. विजेच्या तारा तुटल्याने शहर काळोखात बुडालं. शहरवासीयांना तब्बल ९ ते १० तास अंधारात रात्र काढावी लागली.

शुक्रवार १८ एप्रिलला सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह पावसाने शहराला झोडपले. शहरासह आसपासच्या गावातही वादळी वाऱ्यासह पावसाचा तांडव पाहायला मिळाला. पाच ते सहा दिवसांपासून शहरात ढगाळी वातावरण होते. रात्रीच्या सुमारास वारेही वाहत होते. पावसाचं वातावरण तयार व्हायचं पण पाऊस मात्र यायचा नाही. परंतु १८ एप्रिलला दुपारी उष्ण वातावरण असतांनाच सायंकाळी निसर्गानं रूप बदललं. अचानक आकाशात ढग दाटून आले व सुसाट वारे वाहू लागले. क्षणातच चक्रीवादळाप्रमाणे वाऱ्याची गती वाढली. दरम्यान पावसानेही जोर धरला. वादळ वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे शहरात एकच धांदल उडाली. नागरिक आपापलं घर जवळ करण्याच्या फिकरीत लागले. सैरभैर झालेले लोक घराकडे धाव घेऊ लागले. पण वाऱ्याचा वेग आणि निसर्गाचं विक्राळ रूप पाहून भयभीत झालेल्या नागरिकांनी मिळेल तेथे आसरा घेण्यास सुरवात केली. पाल्यापाचोळ्याप्रमाणे वस्तू हवेत उडत होत्या. वाऱ्याची गती उरात धडकी भरवणारी होती. घरावरील टिनपत्रे पत्त्याप्रमाणे उडायला लागली. टिनपत्रेच काय घराचं अख्ख छतच उडाल्याचं पाहायला मिळालं. 

शहरात भरणारी जत्रा आणि नेमका त्याच दरम्यान येणारा वादळी पाऊस हे आता समीकरणच जुळलं आहे. जत्रा भरली की वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडतोच. अपवाद सोडल्यास जत्रेदरम्यान एकदा तरी वादळी पाऊस येतोच, असे बुजुर्ग सांगतात. आधी जत्रेत लोकनाट्य व मोठमोठ्या सर्कस यायच्या. मात्र खूप वर्षांपूर्वी अशाच प्रकारे वादळ वारा व सुसाट्याचा पाऊस आल्याचे सांगण्यात येते. सुसाट वादळ वाऱ्यामुळे त्यावेळी सर्कसचा तंबूच कोसळला होता. त्यामुळे सर्कसचं फार मोठं नुकसान झालं होतं. सर्कस मधील प्राणी व सर्कस बघण्याकरिता गेलेले नागरिकही जखमी झाले होते. त्यानंतर रंगनाथ स्वामी जत्रेत कधी मोठी सर्कस अवतरलीच नाही. जत्रेत येणारी लोकनाट्येही कालांतराने लोप पावली. आता जत्रा केवळ नावालाच उरली आहे. 

जत्रेत पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. पालिका प्रशासनाची उदासीनताही जत्रेचं स्वरूप बदलण्यास कारणीभूत ठरली आहे. बैल बाजारही आता पूर्वी सारखा भरत नाही. त्यामुळे रंगनाथ स्वामी जत्रा ही कालांतराने इतिहासात तर जमा होणार नाही ना, ही साशंकता वाटू लागली आहे. मात्र यावर्षी अगदीच दाटिवाटीने भरलेल्या या जत्रेला अनेक वर्षानंतर वणीकरांनी अनुभवलेल्या वादळाचा मोठा फटका बसला. जत्रेतील दुकानाचं मोठं नुकसान झालं. बैल बाजारही विस्कळीत झाला. एवढेच काय तर अनेक वर्षांत पहिल्यांदाच चक्रीवादळासारखा अनुभव आलेल्या या सुसाट वादळामुळे जनजीवनही काही काळ विस्कळीत झालं होतं. सुदैवाने जीवित हानी  झाली नसली तरी लोकांचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. 

No comments:

Powered by Blogger.