टायर पंचर दुरुस्तीचे दुकान असलेल्या तरुणाचा अभिनय क्षेत्रातील थक्क करणारा प्रवास

प्रशांत चंदनखेडे वणी 

स्वप्न तर सगळेच बघतात, पण स्वप्नांना वास्तवात उतरविण्याची जिद्द बाळगल्यास स्वप्नांच्या क्षितिजापलीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. स्वप्न साकार व स्वप्नांना आकार देण्याचं सामर्थ्य अंगी असेल तरच यशस्वी जीवनाची वाट गवसते. स्वप्नांना प्रयत्नांची किनार मिळाली की, स्वप्नवत वाटणाऱ्या जगातही पाऊल ठेवता येतं. जीवनात अशक्य असं काहीच नाही, पण ते साध्य करण्याची जिद्द माणसात असली पाहिजे. स्वप्न सर्वांनाच खुणावतात पण स्वप्नांचा पाठलाग करणारा माणूसच जीवनात यशस्वी होतो. ते म्हणतात ना "मंझिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो मे जान होती है, पंखों से कुछ नही होता, हौसलों से उडान होती है,"। 

अशाच एका धेय्यवेड्या तरुणाने स्वप्नवत वाटणाऱ्या चंदेरी दुनियेत आपलं पाऊल रोवलं आहे. त्याने स्वप्न बघितली आणि ती साकारही करून दाखविली. अभिनेता बनण्याचं त्याचं स्वप्न हळू हळू साकार होतांना दिसत आहे. चित्रपटात अभिनय करण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या अंतरमनात ठायी ठायी रुजली होती. अभिनय करण्याच्या इच्छाशक्तीने झपाटलेला हा तरुण छोट्या पडद्यावरील भूमिकेसाठी ऑडिशन देऊ लागला. अशातच त्याची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरु झाली. त्याच्या अपार प्रयत्नानंतर त्याला नेटफ्लिक्स वरील वेबसिरीजमध्ये अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून बघितलेच नाही. तो अभिनयाच्या दुनियेत एक एक पाऊल पुढे टाकत गेला. त्याच्या कौशल्याची चमक सर्वांचेच डोळे दिपवणारी ठरली. आणि कसदार अभिनयामुळे त्याला एका मराठी चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्याने स्वप्नांचा सुरु केलेला प्रवास वास्तवात उतरला. आणि आपल्या प्रयत्नातून त्याने स्वप्नाच्या पलीकडची दुनिया गाठली. त्यातच आनंदाची बाब म्हणजे त्याच्या स्वप्नांचं सोनं करणारा क्षण साकारला आहे. त्याच्या सुंदर अशा अभिनयाने साकारलेला मराठी अल्बम तयार झाला असून या अल्बमचं एक हृदयस्पर्शी गीत नुकतंच रिलीज झालं आहे. या धेय्यवेड्या तरुणाने सुरु केलेला चंदेरी दुनियेचा हा अनपेक्षित प्रवास यशस्वी वळणावर पोहचला आहे.

शहरातीलच एका सर्वसामान्य तरुणाच्या संघर्षमय जीवनाची ही गाथा आहे. शुभम रमेश उगले या तरुणाने अभिनयाचं वेड पांघरलं. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. कुटुंबाचा व नातलगांचा दूर दूर पर्यंत अभिनयाशी संबंध नाही. तरीही त्याला अभिनेता बनण्याचा ध्यास लागला. अभिनेता होण्याच्या ओढीनं त्याला पछाडलं. अभिनयाचे नवनवीन पैलू तो आत्मसात करू लागला. अभिनयाचं कसब त्यानं अंगिकारण्यास सुरवात केली. वेगवेगळ्या पथनाट्यातूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. अथांग इच्छाशक्तीच्या जोरावर त्याचा अभिनयाचा व अभिनेता बनण्याचा प्रवास सुरु झाला. शुभम उगले याला कुठलही कलेचं देण नाही की, कुटुंबाचं पाठबळ नाही. टायर पंचर दुरुस्तीचे काम करणारा हा तरुण. दिवसभर अंगमेहनतीचं काम केल्यानंतर अंगात त्राण नाही की, डोळ्यात स्वप्न नाही. स्वप्न बघतानाही संकोच वाटेल अशी स्वप्न डोळ्यात साठवणं म्हणजे विनोदाभासच. तरीही त्याच्या डोक्यात अभिनयाची संकल्पना आली. अभिनेता बनण्याचं धाडसी स्वप्न तो बघू लागला. आणि अशातच त्याने अभिनयाचे धडे गिरवायलाही सुरवात केली.

दिवसभर टायर पंचर दुरुस्तीच्या दुकानात राबायचं आणि फावल्या वेळात अभिनयाचा सराव करायचा. जिद्दीने पेटलेल्या या तरुणाने अभिनयाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आत्मसात केल्या. वेगवेगळे अभिनय त्याने अंगिकारले. अनेक दिवस अभिनय अंगिकारण्यात परिश्रम घेतल्यानंतर तो छोट्या पडद्यावर भूमिका साकारण्याकरिता ऑडिशन देऊ लागला. एका मागून एक ऑडिशन दिल्यानंतर अखेर त्याचं नशीब फडफडलं. त्याच्या अभिनय करण्याच्या जिद्दीपुढे नशीबालाही झुकावं लागलं. स्वतःचं नशीब स्वतः घडविणाऱ्या या तरुणाला शेवटी नेटफ्लिक्स वरील "मर्डर इन कोर्ट रूम" या वेबसिरीजमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोनं केलं. या वेबसिरीज मधील त्याची ही भूमिका प्रचंड गाजली. 

त्यानंतर तो आता लवकरच "पल्याड रावसाहेब" या मराठी चित्रपटात झळकणार आहे. आणि त्यातच आनंदाची गोष्ट म्हणजे शुभमच्या अभिनयाने साकारलेला पहिला मराठी अल्बम तयार झाला असून या अल्बम मधील "तू दिसता" हे हृदयस्पर्शी गीत नुकतंच रिलीज झालं आहे. या तरुणाने जिद्द व परिश्रमाने अभिनय क्षेत्रात निर्माण केलेलं अस्तित्व वणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यासारखं आहे. कौशल्य तर सर्वातच असतं, कौशल्याच्या जोरावर नावलौकिकही मिळविता येतं, पण कौशल्य दाखविण्यासाठी परिश्रम घेणं सर्वांनाच शक्य होत नाही. ते शुभम सारखे दृढनिश्चयी तरुणच करू शकतात. परिस्थितीचं रडगाणं गाणाऱ्यांकरिता शुभमच्या जिद्द व परिश्रमाची ही प्रेरणावाट बोध घेण्यासारखी आहे. असाध्य असं काहीच नसतं, फक्त ते साध्य करण्याची जिद्द उरात पेटली पाहिजे. शुभम उगले या तरुणाची प्रेरणादायी वाटचाल खरंच आदर्श घेण्यासारखी आहे. "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हे महापुरुषाचे चिरंतर विचार शुभमच्या या यशोगाथेमुळे सार्थकी ठरल्यासारखे वाटतात.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी