![]() |
संग्रहित फोटो |
विद्युत खांबावर चढून वीजप्रवाह सुरळीत करतांना रोजंदारीने काम करणाऱ्या एका कामगाराचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. २० एप्रिलला घडली. अतुल भाऊराव कोसारकर (३०) रा. मोहुर्ली ता. वणी असे या करंट लागून मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे.
१८ एप्रिलला आलेल्या वादळी पावसामुळे मोठंमोठे वृक्ष कोसळले. एमआयडीसी परिसरातही एका विद्युत खांबावर वृक्ष कोसळल्याने विद्युत तारा तुटल्या होत्या. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला वीज प्रवाह सुरळीत करण्यास सांगितले. कंत्राटदाराने तुटलेल्या विजेच्या तारा जोडण्याकरिता त्याठिकाणी मजुर पाठविले. कंत्राटदाराने पाठविलेले दोन मजूर विद्युत खांबावर चढून वीज तारांवर कोसळल्या वृक्षाच्या फांद्या तोडत असतांना एका मजुराला जिवंत विजेच्या तारेचा स्पर्श झाला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वीज प्रवाह सुरळीत करण्याचे काम सुरु असतांना त्याठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करणे गरजेचे असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एका रोजंदारी मजुराचा नाहक बळी गेला. ठेकेदारीतील मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सोइ सुविधा पुरविल्या जात नसल्याने वीज खांबांवर चढून जोखमेची कामे करणाऱ्या मजुरांना आपला जीव गमवावा लागत आहे. वीज प्रवाह सुरळीत करतांना विजेचा धक्का लागून रोजंदारी युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments: