प्रशांत चंदनखेडे वणी
रेती तस्करीसाठी पूरक असलेला तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. रेती तस्करांचं पीक येथे वाढतच चाललं आहे. वाळू तस्करांनी येथे आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. महसूल विभागाला न जुमानता वर्धा व पैनगंगा नदीच्या रेती घाटांवरून वाळू चोरटे सर्रास वाळूची चोरी करतांना दिसत आहेत. तस्करांनी वर्धा व पैनगंगा नदी पात्र अक्षरशः पोखरून टाकले आहेत. दररोज रेती घाटांवरून रेती भरलेले ट्रक निघत आहेत. अवैधरित्या रेतीचं उत्खनन करून १० व १२ चाकी ट्रकांच्या माध्यमातून बिनधास्त रेतीची तस्करी केली जात आहे. तालुक्यात वाळू तस्करी अनेक दिवसांपासून सुरु असून वाळू तस्करीला उधाण आलेलं असतांनाही वाळू तस्करी रोखण्याकरिता महसूल विभागाकडून कुठेलेही ठोस पाऊल उचलण्यात आल्याचे दिसत नाही.
आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा, अशा प्रकारची कार्यवाही होतांना दिसत आहे. त्यामुळे रेती तस्करीच्या या पटलावर तस्कर व महसूल विभाग साकारत असलेल्या भूमिकांची शहरात जोरदार चर्चा होतांना दिसत आहे. रेती तस्करांनी उच्छाद मांडला असतांनाही महसूल विभाग तस्करांविरुद्ध कार्यवाहीचा बडगा उगारत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. असे असले तरी आधी निव्वळ रेती चोरीच्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करणाऱ्या महसूल विभागाकडून आता रेती चोरी करणारे ट्रक पकडण्याचंही धाडस दाखविलं जात आहे. २२ एप्रिलला महसूल अधिकाऱ्यांनी रेती चोरी करणारा आणखी एक ट्रक पकडला. वणी नांदेपेरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ सापळा रचून भरदिवसा चोरीची रेती वाहून नेणाऱ्या ट्रकवर महसूल विभागाने धडक कार्यवाही केली. महसूल विभागाने रेती भरलेला ट्रक ताब्यात घेऊन वणी आगारात लावला आहे.
तालुक्यात रेती तस्करांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. रेती तस्करीतून तस्कर मालामाल झाले आहेत. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून तस्कर रेती तस्करीचे डाव साधू लागले आहेत. नदी पात्रातून बेसुमार रेतीचा उपसा करणारे वाळू माफिया नेहमीच पडद्याआड राहिले आहेत. रेती घाटांवर अवैध हक्क सांगणारे वाळू तस्कर बेनाम बादशाह प्रमाणे वावरतांना दिसत आहेत. वाळू घाटावर कार्यवाही होऊनही मुख्य तस्कराचं नाव मात्र समोर येत नाही. वाळू माफिया आजही कॉलर टाईट करूनच राहत आहेत. महसूल अधिकारी निव्वळ वाहनांवर कार्यवाही करून धन्यता मानत आहेत. रेती घाट बंद असतांनाही रेतीचे मोठमोठे साठे पाहायला मिळाले. बांधकामाच्या ठिकाणी आजही रेतीची मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्याचे दिसून येते. रस्त्यांनी रेतीचे ट्रक व ट्रॅक्टर बिनधास्त रेतीची अवैध वाहतूक करतांना पाहायला मिळतात. रेतीचा सर्रास काळा बाजार सुरु असतांना केवळ थातुर मातुर कार्यवाही होतांना दिसते. मुख्य तस्करांना सोडून केवळ वाहनांवर कार्यवाही केली जाते. रेती चोरी करणारी दोन चार वाहने पकडल्याने रेती तस्करीला आळा बसणार नाही. तर रेती तस्करांवर जरब बसवणं गरजेचं झालं आहे.
परजिल्ह्यातील तस्करांनीही आता तालुक्यातील रेती घाटांकडे आपला मोर्चा वळविला आहे. परजिल्ह्यातील तस्करांनी येथे रेती तस्करीचा घाट मांडला आहे. परजिल्ह्यातील तस्करही येथे रेती तस्करीत मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. रेती तस्करीत परजिल्ह्यातील तस्करांचाही बोलबाला दिसून येत आहे. शेलू रेती घाटावर झालेल्या कार्यवाहीत नदी पड्याल असलेल्या गावातील तस्कराचं नाव चर्चेत आलं होतं. मागील काही दिवसांत रेती तस्करीच्या वाहनावर झालेल्या कार्यवाहीतही परजिल्ह्यातीलच वाहन मालकांची नावे पुढे आली आहेत. २२ एप्रिलला महसूल विभागाने रेतीची चोरी करतांना पकडलेला ट्रकही परजिल्ह्यातीलच तस्कराचा असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे रेती चोरीच्या ट्रकांवरील कार्यवाहीत महसूल विभागाने आणखी तत्परता दाखविण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अत्याधुनिक तंत्र प्रणालीच्या माध्यमातूनही रेती तस्करीवर रोख लावणे शक्य होऊ शकते. गुन्हेगारीवर अंकुश लावण्याकरिता शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात रेती तस्करीची वाहनेही कैद होत असतीलच. तरीही रेती तस्करीला पायबंद घालण्यासाठी व तस्करांना चाप लावण्यासाठी रेती घाटांवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवणे किंवा रेती घाटांवरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे हा देखील एक उत्तम पर्याय ठरू शकतो. असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांना घराचं बांधकाम करता यावं यासाठी रेती घाटांचा कायदेशीर लिलाव करणेही तेवढेच जरुरीचे झाले आहे.
नांदेपेरा मार्गाने रेतीची चोरटी वाहतूक सुरु असल्याच्या माहिती वरून महसूल अधिकाऱ्यांनी रेल्वे क्रॉसिंग जवळ सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सापळा रचला. दरम्यान महसूल अधिकाऱ्यांना एक ट्रक नांदेपेरा कडून वणीकडे येतांना दिसला. अधिकाऱ्यांनी तो ट्रक थांबवून ट्रकची तपासणी केली असता त्यात ५ ब्रास रेती आढळून आली. अधिकाऱ्यांनी चालकाकडे रेतीच्या वाहतुकी बाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. ट्रक चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना देखील नव्हता. महसूल अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने अजय आनंदराव कुमरे रा. चंद्रपूर असे सांगितले. तसेच त्याला ट्रक मालकाचे नाव विचारले असता त्याने योगेश अरुण मनगटे रा. एमआयडीसी चंद्रपूर असे सांगितले. ट्रक चालकाकडे रेती वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याने रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक (MH ३६ AA ११८४) महसूल अधिकाऱ्यांनी जप्त करून वणी आगारात लावला. ही कार्यवाही एसडीओ, तहसीलदार, नायब तहसीलदार तथा महसूल विभागाने केली.
No comments: