प्रशांत चंदनखेडे वणी
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्ती प्रचंड वाढली असून गुन्हेगारी कारवायांमध्येही प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्राणघातक हल्ले व मारहाणीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. पोलिसांचा जराही धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे. मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंदिवाढोणा येथे गावच्या पोलिस पाटलाला दोन भावांनी थापडा बुक्क्या व कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना २१ एप्रिलला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. आरोपींनी कुऱ्हाडीचा केलेला वार पोलिस पाटलाने हाताने रोखल्याने मोठा अनर्थ टळला. नाही तर खडकडोह येथील घटनेची पुनरावृत्ती झाली असती. झालेल्या मारहाणी बाबत पोलिस पाटलाने मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी भावंडांवर गुन्हा दाखल केला आहे.
वणी तालुक्यातील सोनेगाव येथे वास्तव्यास असलेले संजय लक्ष्मीनारायण जयस्वाल (५५) हे शेतकरी असून सोनेगावचे पोलिस पाटील देखील आहेत. त्यांच्याकडे ट्रॅक्टर ट्रॉली असून ते ट्रॅक्टर भाडेतत्वार देखील चालवितात. २१ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता बंदिवाढोणा येथील शेतात शेणखत टाकण्याकरिता पोलिस पाटलाने ट्रॅक्टर पाठविला. बंदिवाढोणा येथील शेतात शेणखत खाली केल्यानंतर गावातीलच महेश मेरचंद चव्हाण व प्रविण मेरचंद चव्हाण या दोन भावंडांनी ट्रॅक्टर चालक योगेश बहादूर यादव याला तेथीलच एका नाल्यात त्यांनी तोडून ठेवलेली लाकडे ट्रॉलीमध्ये भरून त्यांच्या घरी आणून टाकल्यास ५०० रुपये भाडे देतो, असे म्हटले. भाडे मिळणार असल्याने ट्रॅक्टर चालकानेही होकार दिला. मात्र नंतर या दोन भावंडांनी ट्रॅक्टर चालकाशीच वाद घालून त्याला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. एवढेच नाही तर प्रविण चव्हाण हा तुला जीवानिशी ठार मारतो म्हणत कुऱ्हाड हातात घेऊन चालकाच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे भयभीत झालेल्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर तेथेच सोडून तेथून पळ काढला. ही आपबिती त्याने ट्रॅक्टर मालक व पोलिस पाटील संजय जयस्वाल यांना सांगितली.
त्यामुळे संजय जयस्वाल व त्यांचा पुतण्या अंकित जयस्वाल हे स्वतः ट्रॅक्टर आणण्याकरिता रात्री १० वाजता बंदिवाढोणा येथे गेले. ते दोघेही ट्रॅक्टर उभा असलेल्या शेताकडे जात असतांना महेश चव्हाण व प्रविण चव्हाण यांनी त्यांना रस्त्यात अडविले. तू कुठे चालला असा दम देत ते दोघेही पोलिस पाटलाशी वाद घालू लागले. पोलिस पाटलांनी त्या दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला. पण ते काही एक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी सरळ पोलिस पाटलाला थापडा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. एवढेच नाही तर महेश चव्हाणने कुऱ्हाडीचा केलेला वार पोलिस पाटलाने हाताने रोखून धरल्याने मोठा अनर्थ टाळला. तरीही कुऱ्हाडीचा दांडा पोलिस पाटलाच्या डोक्याच्या डाव्या बाजूला लागला. त्यामुळे त्यांचे डोके फुटून त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. महेशने नंतर त्यांच्या कंबरेवरही लाकडी दांड्याने मारहाण केली. चव्हाण बंधू पोलिस पाटलाला मारहाण करीत असतांना गावातीलच उमेश राठोड यांनी मध्यस्थी करीत पोलिस पाटलाचा बचाव केला.
त्यानंतर पोलिस पाटील हे ट्रॅक्टरकडे गेले असता त्यांना या दोन भावांनी ट्रॅक्टरची प्रचंड तोडफोड केल्याचे आढळून आले. महेश चव्हाण व प्रविण चव्हाण यांनी ट्रॅक्टरचे जवळपास दीड ते दोन लाखांचे नुकसान केले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यातच या दोघांनी तू आमच्या नादाला लागू नको, आधीच एक मर्डर केला आहे, तुझा खून करायलाही वेळ लागणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे पोलिस पाटील संजय जयस्वाल यांनी या दोन्ही भावांविरुद्ध मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी महेश चव्हाण (४०) व प्रविण चव्हाण (३८) रा. बंदिवाढोणा या दोन्ही आरोपी भावंडांवर बीएनएसच्या कलम 115(2), 118(1), 126(2), 296, 3(5), 324(5), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
No comments: