Latest News

Latest News
Loading...

जमील उर्फ मौला याने शिवीगाळ, धमकी व लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याच्या दोन वेगवेगळ्या तक्रारी


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे राहणारा जमील उर्फ मौला एनुलहक शेख (२४) हा गुंड प्रवृत्तीचा तरुण असून तो गुंडगिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. अपराधीक कारवायांनी नेहमी चर्चेत राहणाऱ्या राजूरची ती ओळख पुसली जात असतांनाच काही भाईगिरी अंगात आणणारे तरुण परत गुन्हेगारी वर्तुळ तयार करू लागले आहेत. भाईगिरीचा आव आणून लोकांमध्ये दहशत पसरवू लागले आहेत. राजूर येथील गुन्हेगारी कारवायांची धग कमी झालेली असतांना हे अपप्रवृत्तीचे तरुण गुन्हेगारी क्षेत्राला हवा देण्याचं काम करीत आहेत. मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर या गावात परत दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून केलं जात आहे. जमील उर्फ मौला याच्या विरुद्ध शिवीगाळ, धमकी व लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याच्या दोन वेगवेगळ्या तक्रारी पोलिस स्टेशनला करण्यात आल्या आहेत. मौला याच्या पासून जिवीतालाही धोका असल्याचे तक्रारकर्त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

राजूर (कॉ.) येथे राहणाऱ्या मो. सलीम मो. कादिर अली (२४) याचे वडील मो. कादिर अली झाकीर अली (४८) यांनी मौला याला २५०० रुपये उसणवारीने दिले होते. मात्र मौला पैसे परत करण्याऐवजी त्यांनाच दिसेल तेथे शिवीगाळ व धमकी देत होता. अशातच १८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता सलीम हा भगतसिंग चौकात बसून असतांना मौला व त्याचा भाऊ आसिफ उर्फ रिज्जू एनुलहक शेख हे तेथे कारने आले. तेव्हा सलीमने माझ्या वडिलांचे पैसे का देत नाही असे मौला याला विचारले. त्यावर मौला चांगलाच भडकला. त्याने थेट सलीमला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. तेंव्हा सलीमने मारतो कशाला असे म्हटले असता मौलाने त्याला चल कारमध्ये बस असा दम दिला. मात्र सलीमने त्याच्या गुंडगिरीपुढे नमतं घेत तेथून काढता पाय घेतला. 

परंतु सलीम व त्याचे वडील कादिर हे दुचाकीने अल्युमिनियमच्या दुकानाकडे जात असतांना मौलाने त्यांना थांबविले. तेव्हा कादिरने मुलाला मारहाण का केली असे मौलाला विचारले. तेव्हा तू कोण विचारणारा असे म्हणत मौला व त्याच्या भावाने सलीम व कदीरला शिवीगाळ करीत कुऱ्हाडीच्या दांड्याने कादिरला मारहाण केली. तसेच मौलाचा भाऊ जिशान एनुलहक शेख याने लोखंडी रॉड सलीमच्या डोक्यावर मारला. त्यामुळे सलिमचे डोके फुटले. सलीमच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालयातून त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. दरम्यान मौलाने त्याच्या घरासमोर जाऊन त्याच्या कुटुंबियांनाही शिवीगाळ करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. चंद्रपूर येथे उपचार घेतल्यानंतर सलीमने झालेल्या मारहाणी बाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. मो. सलीम कादिर अली याच्या तक्रारी वरून पोलिसांनी जमील उर्फ मौला एनुलहक शेख, आसिफ उर्फ रिज्जू एनुलहक शेख, जिशान एनुलहक शेख या तीनही आरोपींवर बीएनएसच्या कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

वेकोलि कर्मचाऱ्यालाही केली मारहाण 

जमीर उर्फ मौला एनुलहक शेख व त्याचा भाऊ रज्जू शेख यांच्या विरुद्ध दुसरी तक्रार वेकोलि कर्मचारी कमलप्रसाद जवाहरलाल केवट (३८) यांनी नोंदविली आहे. कमलप्रसाद केवट हे भांदेवाडा कोळसाखाणीत कार्यरत असून ते राजूर येथील डब्ल्यूसीएल क्वाटरमध्ये राहतात. १८ एप्रिलला कमलप्रसाद हे क्वार्टरमध्ये आराम करीत असतांना मौला याने त्यांना फोन करून तुझ्याशी बोलायचे आहे, तू बाहेर ये असे म्हटले. त्यामुळे कमलप्रसाद हे त्याला भेटण्याकरिता गावातील लल्लाच्या पानठेल्याजवळ गेले. तेथे मौला व त्याचा भाऊ रज्जू हे दोघेही हजर होते. मौला याने कमलप्रसाद यांना माझ्या प्रेम प्रकरणाबद्दल तुने तिच्या भावाला का सांगितले यावरून वाद उपस्थित केला. कमलप्रसाद याने मी कुणाला काहीही सांगितले नाही असे म्हणताच रज्जुने कमलप्रसादचे दोन्ही हात पकडले. आणि मौला याने लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याच्या मागे व हातावर मारला. या मारहाणीत कमलप्रसाद यांचा हात फ्रॅक्चर झाला. तसेच मौला याने कमलप्रसाद याला तुझ्यामुळे माझ्या गाड्या पकडल्या गेल्याने त्याची तू भरपाई दे, अन्यथा तुला याहीपेक्षा जास्त मारेन व जीवानिशी मारून टाकेन अशी धमकी देतानाच तुझ्या मुलांना उचलून नेल्याशिवाय राहणार नाही असा दम दिला. त्यामुळे कमलप्रसाद त्यांनी सरळ पोलिस स्टेशन गाठून मौला व त्याचा भाऊ रज्जू याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. कमलप्रसाद केवट यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी मौला व रज्जू शेख या दोन्ही आरोपी विरुद्ध बीएनएसच्या कलम ११८(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.