प्रशांत चंदनखेडे वणी
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन सातत्याने केंद्र व राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस पाळून निषेध आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वणी, मारेगाव व झरी तालुक्याच्या वतीनेही महाराष्ट्र दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर सकाळी १० वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात विदर्भावर नेहमी अन्याय होत आला आहे. राज्यकर्त्यांनी विदर्भाला नेहमी सावत्र वागणूक दिली आहे. मुबलक खनिज संपत्ती व वन संपत्तीने नटलेला विदर्भ नेहमीच उपेक्षित राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाची प्रगती होणे हे अशक्यप्राय आहे. महाराष्ट्रात विदर्भाला कधी न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवणं म्हणजे मृगजळाच्या पाठीमागे लागण्यासारखं आहे. तेंव्हा विदर्भातील जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय उरला आहे. आणि म्हणूनच विदर्भ राज्य आंदोलन समिती वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सातत्याने लढा देत आहे. परंतु वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेलं हे सरकार आता आपल्या शब्दांपासून फिरलं आहे.
मात्र तरीही विदर्भाला राज्याचा दर्जा मिळवून दिल्याशिवाय शांत बसायचं नाही, हा पवित्रा विदर्भ राज्य आंदोलन समितीने घेतला आहे. विदर्भातील जनतेला उच्च शिक्षणाच्या संधी, रोजगार व समृद्ध जीवन जगण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. मात्र विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भवाद्यांवरील हा अन्याय दूर करण्याकरिता वेळ पडल्यास जीवाची बाजी लावायलाही मागे हटणार नाही, अशी भूमिकाच विदर्भवादी आंदोलन समितीने घेतली आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र दिन हा काळा दिवस पाळून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने राज्यभर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
त्याच अनुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वणी, मारेगाव व झरी तालुक्याच्या वतीनेही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातून विदर्भाला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी, अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करावी, या प्रमुख मागण्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भप्रेमी जनतेने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची तीव्रता दर्शविण्याकरिता १ मे ला होणाऱ्या निषेध आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी केले आहे.
No comments: