प्रशांत चंदनखेडे वणी
राजूर विकास संघर्ष समितीच्या विद्यमाने २६ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राजूर बुद्धविहाराजवळील महिला मंडळ हॉलमध्ये ही प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या प्रबोधन कार्यशाळेत "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्य समाजवाद" या विषयावर अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गीत घोष हे मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प.स. सदस्य अशोक वानखेडे हे राहतील. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राजूर ग्रा.प. सरपंच विद्या पेरकावार, माजी सरपंच प्रणिता मो. असलम, पो. पा. वामन बल्की, महादेव तेडेवार, राजूर दीक्षाभूमी बुद्धविहार समितीचे सचिव जितकुमार चालखुरे, आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे ऍड. अरविंद सिडाम, मारोती बल्की, अनिल डवरे, दिनेश बल्की यांची उपस्थिती लाभणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा अथांग सागर आहेत. त्यांच्या ज्ञानाने विश्वाला चकित केलं. त्यांच्या ज्ञानाचा पाझर अख्ख्या विश्वात झाला असतांना एवढ्या वर्षांनंतरही त्यांच्या कार्याची महिती बहुजनांना सांगावी लागते, यापेक्षा मोठी शोकांतिका आणखी काय असू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक विचारधारा आहेत. त्यांच्या विचारातून मानवता संपन्न समाज तयार झाला आहे. त्यांच्या रूपाने देशाला एक वैचारिक वारसा लाभला आहे. आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा त्यांच्या विचारातून मिळते. आपल्या बुद्धी तेजस्वी ज्ञानातून ज्या ज्ञान पंडितानं विश्व चकित केलं, एवढेच नाही भारत देशाची राज्यघटना लिहून देशात लोकशाहीचं पर्व आणलं, बहुजनांना समानतेची वाट मोकळी करून दिली, त्या महामानवाबद्दल आजही बहुजनांना सांगावं लागतं, हे या देशाचं दुर्दैवं मानावं लागेल. महापुरुषांना जातीत विभागण्याचं षडयंत्र येथील व्यवस्थेने सुनियोजितपणे केलं आहे.
पुरोगामी विचारांना बगल देत प्रतिगामिक विचारांची पेरणी केली जात आहे. बहुजनवर्ग अंधभक्त बनत चालला आहे. तर्कशील विचारांचा येथे ऱ्हास होऊ लागला आहे. आपल्या फुटीरवादी संघटना वेगवेगळ्या दिशेने पळत आहेत. पुरोगामी विचारांची लोकं आपल्या विचारांशी विसंगत असलेल्या लोकांच्या पंगतीत बसू लागल्याने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची वेळ भासू लागली आहे. दिशाहीन झालेला समाज योग्य दिशेकडे वळविण्याकरिता आणि महापुरुषांच्या विचारांची प्रताडना करणाऱ्यांना वठणीवर आणण्याकरिता वेळोवेळी प्रबोधनात्मक कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करून त्यांच्या डोक्यात महापुरुषांच्या विचारांचा प्रकाश टाकण्याचं काम करावं लागत आहे. आणि याच उद्देशातून ही प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेतुन महापुरुषांच्या धगधगत्या विचारधारेवर मार्गदर्शन करण्यात येणार असून या कार्यशाळेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे ऍड. कुमार मोहरमपुरी, महेश लिपटे, जयंत कोयरे, राहुल कुंभारे, अमित करमणकर, नंदकिशोर लोहकरे, बंडू ठमके, विजय तोताडे यांनी केले आहे.
No comments: