प्रशांत चंदनखेडे वणी
वाळू तस्करी करणाऱ्या दोन ट्रकांवर महसूल विभागाने कार्यवाही केली असून दोन्ही ट्रक ताब्यात घेऊन वणी एसटी डेपोत लावले आहेत. वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करण्यास महसूल विभाग सरसावला असला तरी रेती तस्कर मात्र महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून रेती तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभाग रेती चोरी करणाऱ्या ट्रकांवर एका मागून एक कार्यवाही करीत असतांना वाळू माफिया मात्र महसूल विभागापुढे वेळोवेळी आव्हान उभे करतांना दिसत आहेत. महसूल विभागाच्या कार्यवाहीची जराही भीती न बाळगता वाळू तस्कर रेती घाटावरून सर्रास रेतीची चोरी करून ती काळ्या बाजारात विकत आहेत. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यवाहीचा वाळू माफियांनी जराही धसका घेतल्याचे दिसत नाही.
महसूल विभागाने दोन दिवसांत दोन रेती तस्करीच्या ट्रकांवर कार्यवाही केली. वरोरा तालुक्यातील करंजी रेती घाटावरून एका कंपनीला रेती वाहतुकीचा परवाना मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या कंपनीने रेतीची वाहतूक करण्याकरिता अनेक ट्रक भाडेतत्वावर लावले आहेत. मात्र वाहतूकदार रेती वाहतुकीच्या पासवर रेती तस्करीचा गोरखधंदा करीत असल्याची माहिती मिळाली आहे. वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या करंजी रेती घाटावरून वाळू भरून येणारे ट्रक काळ्या बाजारात रेतीची विक्री करतांना दिसत आहेत. तसेच वर्धा नदीच्या राळगाव घाटावरूनही पासवर रेती भरून येणारे ट्रक काळ्या बाजारात रेती विकतांना दिसत आहेत. या दोन्ही रेती घाटांवरून एका कंपनीने रेती वाहतुकीच्या घेतलेल्या परवान्यावर रेती तस्कर आपली पोळी शेकून घेत आहेत. या कंपनीला महामार्गाच्या बांधकामाकरिता रेतीचा परवाना मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र वाहतूकदार रेती वाहतुकीच्या पासवर रेती चोरीचे डाव साधत आहेत. परंतु महसूल विभागानेही रेती चोरी करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरिता कंबर कसली आहे. महसूल विभागाने २५ व २६ एप्रिल या दोन दिवसांत रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रक (MH ३४ CA १२१२, MH ४० BG ५०८०) पकडले आहेत. हे दोन्ही ट्रक वणी आगारात लावण्यात आले आहेत. कंपनीच्या रेती वाहतुकीच्या पासवर सर्रास रेती तस्करी सुरु असून ही रेती तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान महसूल विभागापुढे उभे ठाकले आहे. तालुक्यातील रेती घाटांवर तर येथील तस्करांनी धुमाकूळ घातलाच आहे. आता परजिल्ह्यातील तस्करही तालुक्यात रेती तस्करी करतांना दिसत आहेत. त्यामुळे रेती तस्करीवर रोख लावण्यात आधीचा काळ सोडल्यास आता तरी महसूल विभाग कितपत यशस्वी होतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सायंकाळी विठ्ठलवाडी परिसरात बिनधास्त रेती भरलेला हायवा झाला खाली
रेती तस्करांच्या हिंमती सध्या सातव्या आसमानवर आहेत. महसूल विभागाच्या कार्यवाहीला न जुमानता वाळू तस्कर बांधकाम धारकांना अवैधरित्या रेतीचा पुरवठा करतांना दिसत आहेत. काळ्या बाजारात रेतीचा अक्षरशः महापूर वाहत आहे. विठ्ठलवाडी परिसरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सायंकाळी अंदाजे ७.३० वाजताच्या सुमारास चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करणारा हायवा ट्रक बिनधास्त रेती खाली करून गेला. यावरून रेती तस्कर महसूल विभागाला एकप्रकारे आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे. शहरात रेतीची अवैध वाहतूक होत असतांना पोलिस व महसूल विभागाचं खबरी नेटवर्क कुचकामी ठरताना दिसत आहे. वाळू तस्कर शिरजोर होऊन वाळूची तस्करी करीत असून महसूल विभाग मात्र टार्गेटवर कार्यवाही करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महसूल विभाग वाळू तस्करीला प्रतिबंध लावेल काय, असा सूर आता जनतेतून उमटू लागला आहे.
No comments: