Latest News

Latest News
Loading...

मागील काही दिवसांत शहरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर एकही धाड नाही, बुकी हद्दपार झालेत की पोलिसांना गवसत नाही, चर्चेला उधाण

प्रशांत चंदनखेडे वणी 

आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर मागील काही दिवसांत एकही कार्यवाही न झाल्याने आयपीएल क्रिकेटवर सट्टा बाजार गरम करणारे बुकी शहरातून हद्दपार झाले की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. एक वेळ अशी होती की, शहरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर एका मागून एक छापे पडायचे. शहर पोलिसच नाही तर यवतमाळ येथील पोलिस पथकही वणी येथे रेकी करून आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकायचं. परंतु आता शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टाच खेळला जात नसल्याचे पोलिसांच्या न होणाऱ्या कार्यवाही वरून दिसून येत आहे. आयपीएल क्रिकेटवर सट्टा बाजार चालविणारे बुकी शहरातून हद्दपार झाले की, पोलिसांचा कार्यवाहीचा दृष्टीकोन बदलला, हा आता शहरात चर्चेचा विषय बनला आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजार चालविणारे बुकी शहरात आजही त्याच प्रमाणात सक्रिय असल्याची चर्चा आयपीएल क्रिकेट प्रेमींमधूनच ऐकायला मिळत आहे. मात्र शहरातील सट्टा अड्डे पोलिसांच्या नजरेपासून लुप्त झाल्याचे दिसून येत आहे. आणि म्हणूनच आयपीएलचं यावर्षीचं अर्ध अधिक सत्र संपलं असतांनाही आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर एकही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

आयपीएल क्रिकेटचा हंगाम सुरु होताच क्रिकेट सामान्यांवर बेटिंग लावणारे मोट्या प्रमाणात सक्रिय होतात. आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लाखोंचा सट्टा खेळाला जातो. क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग लावण्याकरिता ठिकठिकाणी अड्डे थाटून तेथे क्रिकेट सट्ट्यावर लागवडी घेणारे फंटर बसविले जातात. दोन संघाच्या हारजीत पासून तर कोण किती धावा काढेल, कोणत्या बॉलवर विकेट जाईल व कोणत्या बॉलवर चौकार षटकार लागेल, यावर सुद्धा सट्टा लावला जातो. आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लाखोंचा सट्टा खेळला जातो. वणी शहरात आधी आयपीएल सट्ट्यावर सातत्त्याने धाडी पडायच्या. मात्र आता आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर कार्यवाहीचं प्रमाण नगण्य झालं आहे. जणू शहरातून क्रिकेट सट्टाच हद्दपार झाला की काय, असे वाटू लागले आहे. परंतु आयपीएल क्रिकेट प्रेमी मात्र आजही क्रिकेट सट्टा तेवढ्याच तीव्रतेने सुरु असल्याचे सांगतात. मात्र क्रिकेट बेटिंग अड्डे पोलिसांच्या दृष्टीस पडत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. कधी काळी यवतमाळ जिल्हा पोलिस पथकाकडून शहरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाडी पडायच्या. पण आता मागील काही दिवसांत आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर एकही धाड पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे सट्टा अड्डे गोपनीय ठिकाणी सुरु आहेत, की पोलिसांचा कार्यवाहीचा दृष्टिकोन बदलला आहे, हा सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

शहरात मटका अड्डेही राजरोसपणे सुरु आहेत. पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर मटका अड्डे चालविले जात आहे. पोलिसांचं त्या मार्गाने नेहमी जाणं येणंही सुरु असतं, पण त्यांना खुलेआम सुरु असलेले हे मटका अड्डे दिसत नाही. सिंधी कॉलनी परिसर, एकता नगरच्या विरुद्ध बाजूला एका पानठेल्याजवळ, दीपक चौपाटी परिसर, एवढेच नाही तर कार्यवाही झाल्यानंतरही भाजी मंडई परिसरात मटका अड्डा जैसे थे सुरु आहे. परंतु पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलिसांच्याच मूक संमतीने तर मटका अड्डे सुरु नाहीत ना, अशी चर्चा शहरातून ऐकायला मिळत आहे. 

डॉ. दिलीप पाटील भुजबळ हे यवतमाळचे एसपी असतांना त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची ताकीद दिली होती. त्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर बऱ्यापैकी अंकुश लागला होता. मात्र आता शहरात ठिकठिकाणी राजरोसपणे मटका अड्डे चालविले जात आहे. जिकडे तिकडे मटक्याचा खेळ रंगला आहे. अवैध धंद्यांना शहरात सध्या सुगीचे दिवस आले आहेत. निव्वळ थातुर मातुर कार्यवाही करून टार्गेट पूर्ण करण्याचं काम सुरु आहे. अवैध दारू विक्रीमुळे ग्रामवासी चिंतेत आले आहेत. शहरात बियरबार रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. चोरीच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. तेंव्हा पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासियांमधून होत आहे. 

No comments:

Powered by Blogger.