प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील लक्ष्मी नगर येथिल कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी ४ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवार दि. २८ एप्रिलला पहाटे उघडकीस आली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नांदेपेरा मार्गावरील लक्ष्मी नगर येथे वास्तव्यास असलेले रवींद्र बरडे हे लष्करात आहेत. सैन्य सेवेत असलेले रवींद्र बरडे हे सुट्ट्यांवरच घरी येतात. घरी त्यांची पत्नी सोनू रवींद्र बरडे ही मुलाबाळांसह राहते. त्यांचं दुमजली मकान असून घरी भाडेकरू देखील आहेत. २७ एप्रिलला सोनू बरडे ही कार्यक्रमानिमित्त घराबाहेर गेली असता चोरट्यांनी कुलूपबंद घराला टार्गेट केले. घराचा कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व वस्तू व सामान त्यांनी अस्ताव्यस्त फेकले. बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्यांनी त्यातील सोन्याचांदीच्या वस्तू व दागिन्यांवर हात साफ केला. जवळपास ४ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
चोरट्यांनी सोन्याचे दोन गोफ एक १० ग्राम वजनाचा किंमत ८० हजार रुपये, तर दुसरा २० ग्राम वजनाचा किंमत १ लाख ६० हजार रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या एक ८ ग्राम वजनाची किंमत ६४ हजार रुपये, दुसरी अर्धा ग्राम वजनाची किंमत ४ हजार रुपये, अर्धा ग्राम वजनाची सोन्याची जिवती किंमत ४ हजार रुपये, ५ ग्राम वजनाचे सोन्याचे कानातले किंमत ४० हजार रुपये, ५ ग्राम वजनाचं मंगळसूत्र किंमत ४० हजार रुपये, दोन ग्राम वजनाचे सोन्याचे रिंग किंमत १६ हजार रुपये, ८० ग्राम वजनाचे ४ नग चांदीचे चाळ किंमत ४ हजार रुपये, चांदीचा छल्ला व करदोळा या मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.
चोरट्यांनी बरडे यांच्या घरी चोरीचा डाव साधतांना भाडेकरू राहत असलेल्या घराचे दरवाजे बहरून बंद केले होते. पहाटे भाडेकरूंना घराची दारं बाहेरून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोनू बरडे यांना फोन केला. सोनू बरडे यांनी शेजाऱ्यांना फोन करून भाडेकरूंची बाहेरून बंद असलेली दारे उघडण्यास सांगितले. तेंव्हा त्यांच्या घरी चोरी झाल्याची ही घटना उघडकीस आली. घरी चोरी झाल्याचे कळताच सोनू बरडे यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. त्यांना घरातील सर्व वस्तू दानाफान पडलेल्या दिसल्या. सामान अस्ताव्यस्त फेकलेलं दिसलं. बेडरूप मधील कपाटाचं दार उघडं दिसलं. त्यातील सर्व सोन्याचांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे सोनू बरडे यांनी तात्काळ पोलिस स्टेशनला धाव घेतली. अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ऐवज लंपास केल्याची तक्रार त्यांनी पोलिस स्टेशनला नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर कलम ३३१(४), ३०५(a) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
कुलूपबंद घर म्हणजे चोरट्यांना आमंत्रण
कुलूपबंद घर म्हणजे चोरट्यांना चोरीचं आमंत्रण देण्यासारखं झालं आहे. बंद घरांना हे चोरटे टार्गेट करू लागले आहेत. चोरट्यांनी परत डोके वर काढण्यास सुरवात केल्याने शहारत भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांची शहरातील रात्रीची गस्त मंदावल्याने चोरटे रात्री चोरीचे डाव साधू लागले आहेत. पोलिसांचे रात्री वाजणारे सायरन बंद झाले आणि चोरटे बिनधास्त झाले आहेत. शहरालगत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील बोढाले ले - आऊट येथे जबरी चोरी झाल्याची घटना ताजी असतांनाच चोरट्यांनी परत एका बंद घराला टार्गेट करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. बोढाले ले - आऊट येथील घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. तर लक्ष्मी नगर येथे धाडसी घरफोडी करून चोरट्यांनी ४ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्याची मागणी आता शहरवासियांमधून होऊ लागली आहे.
No comments: