प्रशांत चंदनखेडे वणी
महामार्गाच्या विरुद्ध दिशेने येणारी मोटारसायकल ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. २९ एप्रिलला सायंकाळी ५.४५ ते ६ वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील वागदरा गावाजवळ घडली. अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविले.
वणी वरून चारगाव चौकीकडे जाणाऱ्या कोळसा वाहतुकीच्या ट्रकवर (MH ३४ BZ ३७४७) त्याच मार्गाने विरुद्ध दिशेने (रॉंग साईड) वणीकडे येणारी दुचाकी (MH २९ W ४४३२) आदळली. या अपघातात दुचाकीस्वाराला जोरदार मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच दुचाकी ट्रकवर आदळल्याने दुचाकीचा समोरील भाग व ट्रकचे समोरील बंपर क्षतिग्रस्त झाले आहे. दुचाकीस्वार हा कोरपना तालुक्यातील हेटी या गावचा रहिवाशी असून तो काही कामानिमित्त वणीला येत असतांना हा अपघात घडला. वणी घुग्गुस महामार्गाने विरुद्ध दिशेने वणीकडे येत असतांना दुचाकी अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. यात तो गंभीर जखमी झाला. दशरथ राजकुमार मालेकर (३२) असे या अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापैकी काही प्रत्यक्षदर्शींनी तत्परता दाखवीत रुग्णवाहिकेला फोन करून जखमीला तात्काळ रुग्णालयात हलविले. जखमीवर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
No comments: