प्रशांत चंदनखेडे वणी
दारूडया मुलाने वडिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर दारूच्या नशेत त्याने स्वयंपाक खोलीतील गॅस सिलेंडर हॉलमध्ये आणून आग डब्बीची काडी उगारून घराला आग लावण्याची धमकी दिल्याने भयभीत झालेल्या वडिलांनी पोलिस स्टेशनला येऊन मुलाविरुद्ध तक्रार नोंदविली. वडिलांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील सानेगुरुजी नगर येथे राहणारे अशोक महादेव चटकी (६२) हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा राहुल अशोक चटकी (३२) हा दारूचा प्रचंड व्यसनी आहे. दारू ढोसून आला की तो वडिलांना नेहमी शिवीगाळ करतो. २८ एप्रिलला दुपारी ४ वाजता तो रोजच्या सवयीप्रमाणे दारू पियुन घरी आला. आणि मुलीचे शाळेत ऍडमिशन करण्याकरिता २० हजार रुपयांची मागणी करू लागला. मात्र वडिलांनी माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाही, असे म्हणताच त्याने वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. एवढेच नाही तर अंगणात उभी असलेल्या मोटारसायकलवर पेट्रोल टाकून मोटारसायकला आग लावण्याचा प्रयत्न करीत असतांना वडिलांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने सरळ वडिलांनाच थापडा बुक्क्याने मारहाण करून पैसे न दिल्यास मोटारसायकल जाळून टाकण्याची धमकी दिली.
तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने स्वयंपाक खोलीतील सिलेंडर हॉलमध्ये आणले, व सिलेंडरपुढे आगडब्बीची काडी उगारून घराला आग लावण्याची धमकी देऊ लागला. दारुड्या मुलाचे नशेतील उपद्रव पाहून शेजारी त्याला समजाविण्यास आले. मात्र तो शेजाऱ्यांनाही शिवीगाळ करू लागला. दारुड्या मुलाच्या नशेतील या उपद्रवांमुळे स्वतःच्या व शेजाऱ्यांच्या घराला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता वडिलांनी सरळ पोलिस स्टेशन गाठून दारुड्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली. अशोक चटकी यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी राहुल चटकी या आरोपी मुलाविरुद्ध कलम ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, २८७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: