कुटूंबं गेलं लग्नाला आणि चोरट्यांनी मारला डल्ला, बंद घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा मुद्देमाल केला लंपास
प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील चिखलगाव येथे घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना १९ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चिखलगाव येथील बोढाले ले-आऊट येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. हेमंत पुरुषोत्तम देठे (३७) यांच्या तक्रारी नुसार ते कुटुंबासह नागपूर येथे लग्नाला गेले होते. घराला कुलूप लागले असल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. चोरट्यांनी कुलूपबंद घराला टार्गेट करीत घरातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कमेवर हात साफ केला. दरवाजाचा कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूमधील कपाट फोडून त्यात ठेऊन असलेले २० ग्राम वजनाचे दोन सोन्याचे मंगळसूत्र किंमत १ लाख ६० हजार रुपये, ५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या किंमत ८० हजार रुपये, २ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या किंमत ३२ हजार रुपये, सोन्याचा गोफ किंमत ३२ हजार रुपये, सहा चांदीचे चाळ किंमत १० हजार रुपये व रोख रक्कम १ लाख ३५ हजार रुपये असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. घरमालकाला घरी चोरी झाल्याचे कळताच त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशनला धाव घेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी हेमंत देठे यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३३१(४), ३०५(a) नुसार गुन्हा दाखल केला आहे. चोरटे बंद घराला टार्गेट करू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरालगत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत घरफोडीची ही मोठी घटना घडल्याने चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: