Latest News

Latest News
Loading...

दरोडा प्रकरणातील फरार आरोपीलाही एसडीपीओ पथकाने ठोकल्या बेड्या, आरोपींची संख्या झाली सात


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील प्रगती नगर येथे एका व्यावसायिकाच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा केलेला धाडसी प्रयत्न व्यावसायिकाच्या मुलीने समयसूचकता व सर्तकता दाखवून हाणून पाडला. अतिशय प्लॅनिंगने व्यावसायिकाच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा दरोडेखोरांना पोलिसांनी शीघ्र अटक केली होती. तर एक आरोपी फरारीत होता. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. शेवटी पोलिसांच्या रडारवर असलेला हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून एसडीपीओ पथकाने त्याला हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून अटक केली आहे. बंगालसिंग उर्फ साहेबसिंग रतनसिंग चव्हाण (३६) रा. रेल्वे स्टेशन जवळ वसमत जि. हिंगोली असे या पोलिस पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

प्रगती नगर नगर येथे वास्तव्यास असलेल्या सुभाष डोर्लीकर या व्यावसायिकाच्या घरी ५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री दरोडेखोर शिरले होते. ते त्यांच्या घरात चोरीचा डाव साधण्याच्या प्रयत्नात असतांनाच सुभाष डोर्लीकर यांच्या मुलीच्या सर्तकतेमुळे दरडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरांनी शेवटी तेथून पळ काढला. कारने आलेल्या या दरोडेखोरांनी स्वतःची ओळख पटू नये म्हणून हेलमेट घातले होते. तरीही पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या काही दिवसांतच आरोपींचा सुगावा लावला. सहा आरोपींना शीघ्र अटक केली. दरोडा टाकण्याचा प्लॅन केलेल्या महिलेसह सहा आरोपींना अटक करून त्यांना तुरुंगवारी घडविल्यानंतर पोलिसांनी फरारीत असलेल्या सातव्या आरोपीलाही अटक केली आहे. हा आरोपी आपले अस्तित्व लपवून पोलिसांना वेळोवेळी चकमा देत होता. परंतु पोलिसांनी त्याचा सुगावा लावून त्याला वसमत येथून मोठ्या शिताफीने अटक केली. 

पोलिसांनी व्यावसायिकाच्या निवासस्थानी दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या राणी उर्फ सरस्वती विनोद ब्राह्मणे (३५) रा. हिराणी ले-आऊट वणी, मुकिंदसिंग निक्कासिंग टाक (४०), सावनसिंग मुकिंदसिंग टाक (१९) दोन्ही रा. जालना, समंदरसिंग उर्फ बबलूसिंग रामसिंग टाक (३२) गोकुळनगर वणी, सतनामसिंग गुरुमुखसिंग चव्हाण (३०) रा. वसमत, अजयसिंग सुभाषसिंग चव्हाण (३२) रा. वसमत यांना शोध मोहीम राबवून अवघ्या काही दिवसांतच अटक केली होती. तर घटनेच्या दिवसापासून फरार असलेल्या बंगालसिंग उर्फ साहेबसिंग रतनसिंग चव्हाण याचाही युद्धपातळीवर शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ विजय वानखेडे, पोहेकॉ इकबाल शेख, अमोल नुन्नेलवार यांनी केली. 

No comments:

Powered by Blogger.