प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यात सर्रास रेती तस्करी सुरु असल्याचे महसूल प्रशासनाने केलेल्या कार्यवाही वरून स्पष्ट झाले आहे. वर्धा नदीच्या झोला रेती घाटावर स्वतः तहसीलदारांनी धडक देत अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारी पोकलॅन्ड मशीन व रेतीची चोरटी वाहतूक करणारा हायवा ट्रक ताब्यात घेतला. रेती भरलेला दुसरा ट्रक मात्र ट्रक चालकाने रेती घाटावरून पळवून नेला. तहसीलदार निखिल धुळधर यांनी मध्यरात्री रेती घाटावर जाऊन केलेल्या धडक कार्यवाहीमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ही कार्यवाही रविवार ६ एप्रिलला पहाटे ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु असल्याची ओरड मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. रेती घाट बंद असतांनाही तालुक्यात मुबलक रेतीचा पुरवठा होतांना दिसत आहे. बांधकामाच्या ठिकाणी तर रेतीचा प्रचंड साठा दिसून येतो. रात्रीच्या काळोखात रेती घाटांवर प्रचंड वाळूचा उपसा होत असतांना प्रशासनाच्या मात्र ते दृष्टीस पडत नव्हते. रेती घाटावरून रात्री रेती भरलेली वाहने निघत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतांनाही रेतीची ही चोरटी वाहतूक रोखण्याकरिता महसूल विभागाकडून कुठलीही ठोस पाऊले उचलण्यात आली नाही. त्यामुळे रेती तस्कर प्रचंड निर्ढावले होते. रेती घाटावरून रेतीची चोरी करून ती काळ्या बाजारात विकली जात असल्याची ओरड होऊनही महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हते. आणि म्हणूनच तस्करांच्या हिमती वाढत गेल्या. वाळू माफिया नंतर कुणालाही न जुमानता बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करू लागले. रेती घाटांवरून रेतीची चोरी करून ती सर्रास काळ्या बाजारात विकू लागले. मात्र शासनाने आता रेती तस्करांवर कडक कार्यवाहीचे आदेश दिल्याने महसूल प्रशासनाकडून रेती तस्करांवर कार्यवाहीचा बडगा उगारण्यात आला आहे.
झोला गावाजवळ वर्धा नदीपात्रातून पोकलॅन्ड मशीनने रेतीचा बेसुमार उपसा करून हायवा ट्रकांनी रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याची विश्वसनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर स्वतः तहसीलदार निखिल धुळधर यांनी मध्यरात्री झोला रेती घाटावर धडक देऊन धडाकेबाज कार्यवाही केली. झोला रेती घाटावर रेतीचे अवैध उत्खनन करणारी पोकलॅन्ड मशीन (जेसीबी १४०) व चोरीची रेती वाहून नेणारा एक ट्रक (MH ४० N ६६७०) महसूल विभागाने जप्त केला. परंतु रेती भरलेला दुसरा ट्रक रेती घाटावरून पळवून नेण्यात तस्कर यशस्वी झाले. झोला रेती घाटातून रेतीचा प्रचंड उपसा करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे रेतीच्या झालेल्या उत्खननाचा निष्कर्ष लावून रेती तस्करांवर दंड आकारण्यात येणार आहे. तसेच रेती तस्करांबाबत माहिती मिळवून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही देखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तहसीलदारांनी स्वतः रेती घाटावर जाऊन धडक कार्यवाही केल्याने रेती तस्करांचे काही प्रमाणात का होईना धाबे दणाणले आहेत. महसूल प्रशासनाच्या या बेधडक कार्यवाहीची सर्वत्र चर्चा होतांना दिसत आहे.
No comments: