प्रशांत चंदनखेडे वणी
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांना उधाण आलं आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध धंदे फोफावले असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. रेती तस्करी व अवैध दारू विक्री तर मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. परंतु आता मटका अड्डेही ठिकठिकाणी थाटण्यात आले आहेत. मुकुटबनसह घोन्सा येथे राजरोसपणे मटका अड्डे चालविले जात असतांना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहे. एवढेच नाही तर मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतून गोवंश तस्करीही होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अवैध धंदे रोखण्याकरिता पोलिसांकडून घेण्यात येत असलेली नकारात्मक भूमिका बघता अवैध धंद्यांना पोलिसांचेच पाठबळ मिळत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पोलिसांच्या मधुर संबंधांमुळे अवैध धंद्यांना रान मोकळं झालं असून अवैध व्यावसायिक निर्धास्त झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कमान सैल असल्याने ठाणेदारांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथे आळी मिळी गुप चिळी सुरु असल्याची चर्चा आता चवीने चघळली जात आहे.
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे फळफुलाला आले आहेत. याठिकाणी अवैध व्यावसायिकांनी आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. हप्त्यात गुंतलेली पोलिस यंत्रणा अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. पोलिसांच्या हितसंबंध जोपासण्यामुळे अवैध व्यावसायिकांना अभय मिळतांना दिसत आहे. पोलिसांच्या छुप्या पाठबळामुळेच अवैध व्यावसायिकांना सुगीचे दिवस आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सर्रास सुरु असलेली रेती तस्करी, बिनधोक सुरु असलेली अवैध दारू विक्री पोलिसांची निष्क्रियता दर्शवित आहे. मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतून गोवंश तस्करीही सुरु असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे याकडे आता वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत मटका अड्डेही राजरोसपणे सुरु आहेत. मुकुटबनसह घोन्सा येथे मटका अड्डे चालविले जात असतांना पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. खुलेआम सट्टा मटका सुरु असतांना पोलिस मात्र आंधळेपणाचं सोंग घेऊन आहेत. मुकुटबन येथे मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळला जात आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या कष्टाचा पैसा मटक्याचे आकडे खेळण्यात उडवू लागले आहेत. मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. खुलेआम सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर आकडे लावण्याकरिता नागरिकांची उडत असलेली झुंबळ पोलिसांच्या दृष्टीस पडू नये, याचेच नवल वाटते.
आरसीसीपील सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या वळण रस्त्याजवळील एका बियरबार लगत असलेल्या देशी दारूच्या दुकानाजवळ आणि मुकुटबन येथील स्टेट बँकेच्या मागे मोक्षधाम जवळ उजागिरीने मटका अड्डा चालविला जात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र याठिकाणी राजरोसपणे सुरु असलेले मटका अड्डे पोलिसांना दिसू नये, हीच खरी शोकांतिका आहे. घोन्सा येथेही उजागरपणे मटका अड्डा सुरु आहे. येथील नागरिक मटक्याच्या प्रचंड आहारी गेल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. नोकरदारवर्गाबरोबरच मजूरवर्गही मटक्याच्या आकड्यांवर नशीब आजमावण्यात आपली मिळकत गमावतांना दिसत आहे. तरुणांनाही मटक्याचे प्रचंड व्यसन लागल्याने त्यांचं भविष्य उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आलं आहे.
मुकुटबन येथेच दोन मटका अड्डे सुरु असतांना पोलिस या मटका अड्ड्यांवर कार्यवाही करण्याचं सौजन्य दाखवीत नसल्याने विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या छुप्या परवानगीनेच तर मटका अड्डे सुरु नसावे, या खुल्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. पोलिसांच्या मधुर संबंधांमुळेच अवैध धंद्यांना चालना मिळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होतांना दिसत आहेत. रेती तस्करी, दारू तस्करी व गोवंश तस्करी मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतून होत असतांना याची भनक पोलिसांना लागू नये, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे प्रचंड फोफावले असतांना ते रोखण्याकरिता पोलिस उदासीनता दर्शवित असल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्यामुळे याकडे आता वरिष्ठांनीच लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
No comments: