रेल्वे स्टेशन परिसरात यावर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती होणार जल्लोषात साजरी, भव्य मिरवणुकीचेही आयोजन
प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ थाटात साजरी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हटलं की तरुणाईमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. युवावर्गासह बाबासाहेबांना आदर्श मानणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या जयंतीची ओढ लागलेली असते. त्यांची जयंती साजरी करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारे नियोजन केलं जातं. त्यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. बाबासाहेबांची जयंती जवळ येताच युवावर्गाला तर आनंदाचं भरतं येतच, पण जेष्ठांच्याही चेहऱ्यावर आनंद दर्वळतांना दिसतो. उत्साह व आनंदाचं वातावरण निर्माण करणारी व मानवतेचं दर्शन घडवणारी घटनाकाराची जयंती यावर्षीही रेल्वे स्टेशन परिसरात जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे.
बहुजनांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेने बरबटलेल्या या देशात समानतेची लाट आणली. रूढी परंपरेला फाटा देत त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची वाट मोकळी करून दिली. एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी मोडून काढत त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळवून दिलं. जाती वरून मानसामानसांत भेदाभेद करणाऱ्यांविरुद्ध ते एकटे लढले. जातीभेद पाळणाऱ्यांचे झुंड त्यांनी आपल्या बुद्धीतेजाने पालथे घातले. जातीवाद्यांच्या झुंडांना निधळ्या छातीने समोर जाऊन त्यांना चारही मुंड्या चीत करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे महानायक होते. त्यांनी गुलामीचे साखळदंड तोडून मानवाला जातीय बंधनातून मोकळे केले. दैव नाही तर सदैव विवेक बुद्धिने जीवन जगण्याची त्यांनी समाजाला प्रेरणा दिली. दैववादी नाही तर वास्तवादी दृष्टिकोन त्यांनी समाजात रुजविला.
आन्यायविरुद्ध डरकाळी फोडणारा खरा पँथर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतःचं आयुष्य पणाला लावून ते समाजाच्या उत्थानासाठी लढले. शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या उध्दाराचा विडा उचलणारा युगपुरुष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. समाजातील प्रत्येक घटकाच्या अधिकारांचं रक्षण व्हावं अशी तरतूद त्यांनी राज्यघटनेत केली. महिलांना सामान न्याय मिळवून दिला. सर्वांना शिक्षणाच्या सामान संधी उपलब्ध करून दिल्या. मानवी जीवनाचं नंदनवन करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि म्हणूनच आज सर्व समाजाचे लोक या देशात गुण्यागोविंदानं नांदत आहेत. परंतु आज केवळ नावासाठी कार्य व पुढे पुढे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आणि निष्ठेने कार्य करणाऱ्यांची संख्या रोडावू लागली आहे.
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे कर्मचाऱ्यांनी रोवलेल्या पंचशील झेंड्याजवळ जवळपास ३० ते ३५ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. त्यांच्या जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची परंपराही अखंडीतपणे सुरु आहे. बाबासाहेबांच्या जयंती बरोरबरच, तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन हे कार्यक्रम देखील या ठिकाणी न चुकता घेतले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन वणी द्वारा हे सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात येतात. रेल्वे कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर कार्यक्रम घेण्याची सुरु केलेली परंपरा आता आंबेडकरी विचारांचा वारसा जपणारी त्यांची मुलं पुठे नेत आहेत.
यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. जयंती दिनी वाद्यासह भव्य मिरवणूकही काढण्यात येणार आहे. पंचशील झेंड्याजवळून सायंकाळी ६ वाजता ही मिरवणूक निघून सम्राट अशोक नगर बुद्ध विहार येथे पोहचल्यानंतर तेथून निघणाऱ्या सार्वत्रीक मिरवणुकीत सामील होईल. नंतर सर्व वार्डाच्या मिरवणुकीसोबत शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहचल्यानंतर बुद्ध वंदनेने मिरवणुकीची सांगता होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते जयंती उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. मिरवणूकही शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार असून या मिरवणुकीत मानवी जिव्हाळा जपणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.
No comments: