Latest News

Latest News
Loading...

इंजिनिअरिंग केलेला तरुण घरून अचानक बेपत्ता

प्रशांत चंदनखेडे वणी 

अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केलेला तरुण घरून अचानक बेपत्ता झाल्याची घटना ३ एप्रिलला सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आई वडील मजुरीला गेल्यानंतर हा तरुण अचानक घरून निघून गेला. त्यावेळी त्याची लहान बहीण घरी होती. पण तिलाही काही न सांगता तो घराबाहेर पडला. खूप वेळ होऊनही तो घरी न परल्याने बहिणीने त्याच्या मोबाईलवर फोन केला असता त्याचा फोनही बंद दाखवत होता. नंतर त्याचे आई वडील मजुरीवरून घरी परतल्यानंतर बहिणीने हा सगळा प्रकार आई वडिलांना सांगितला. त्यामुळे त्याचे आई वडील प्रचंड घाबरले. आई वडील व परिसरातील लोकांनी त्याचा जिकडे तिकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रांकडेही त्याची चौकशी केली. सर्वत्र शोध घेऊनही त्याचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने शेवटी त्याच्या आईने शुक्रवार दि. ४ एप्रिलला सकाळी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. यश संजय वसाके (२२) रा. गौरकार कॉलनी (विठ्ठलवाडी) असे या घरून बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

संजय वसाके व त्यांची पत्नी चंदा वसाके हे बांधकाम मजूर म्हणून काम जातात. ३ एप्रिलला ते मजुरीवर गेल्यानंतर त्यांचा मुलगा यश हा घरून कुणालाही न सांगता अचानक निघून गेला. नंतर त्याचा मोबाईलही बंद दाखवत होता. त्यामुळे त्याचे आई वडील प्रचंड घाबरले. त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण तो कुठेही आढळून आला नाही. तीन चार दिवसांपूर्वी त्याच्या आई वडिलांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यात त्याने मध्यस्थी करीत आईला वाद घालण्यावरून खडेबोल सुनावले. त्यामुळे आई त्याच्या सोबत बोलत नव्हती. त्यातच बहिणीचेही लग्न जुळले असल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. अशातच पारिवारिक कलह व चिंतेतून अचानक तो ३ एप्रिलला घरून निघून गेला. त्याचा अद्यापही मोबाईल बंद येत असून पोलिस त्याच्या मोबाईल लोकेशन वरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा तरुण कुणाला कुठेही आढळून आल्यास पोलिस शिपाई सचिन मरकाम (8329872169) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments:

Powered by Blogger.