प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील जगन्नाथ महाराज देवस्थानात चिमूर वरून दर्शनाकरिता आलेली महिला देवस्थानाच्या बाजूलाच सुरु असलेले कीर्तन ऐकण्यासाठी गेली असता अज्ञात चोरट्याने हातचलाखी दाखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गोफ लांबविल्याची घटना ६ एप्रिलला दुपारी १ वाजता घडली. याबाबत महिलेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भांदेवाडा येथील जगन्नाथ महाराज देवस्थानाच्या बाजूला प्रकाश भोयर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम होता. महाराजांचे कीर्तन ऐकण्याकरिता भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा चोरट्यांनीही उठविल्याची घटना समोर आली आहे. जगन्नाथ महाराज देवस्थानात दर्शनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वरून आलेली शारदा गुलाबराव मेहरपुरे (५५) ही महिला जगन्नाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थानाच्या बाजूलाच सुरु असलेले प्रकाश भोयर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेली. प्रकाश भोयर महाराजांचे पूर्ण कीर्तन ऐकल्यानंतर ही महिला महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरिता त्यांचे चरणस्पर्श करण्यास खाली वाकली. तेवढ्याच वेळात अज्ञात चोरट्याने हातचलाखी दाखविली. महिलेच्या गळ्यातील १२ ग्राम वजनाचा (किंमत ६९ हजार ६०० रुपये) सोन्याचा गोफ चोरट्याने लंपास केला. कुणी तरी गळ्यातील गोफ ओढावल्याचे जाणवल्यानंतर ही महिला प्रचंड घाबरली. तिने हाताने गळ्याभोवती चाचपणी केली असता तिच्या हाताला गोफाचा स्पर्श झाला नाही. त्यामुळे सोन्याचा गोफ अज्ञात चोरट्याने लांबविल्याचे तिच्या लक्षात आले.
अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याचा गोफ हिसकावल्याने हादरलेल्या महिलेने सरळ वणी पोलिस स्टेशन गाठले. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. शारदा मेहरपुरे रा. नेहरू वार्ड चिमूर यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर बीएनएसच्या कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: