Latest News

Latest News
Loading...

एमडी ड्रग्ज विक्रेत्या तरुणाला एलसीबी पथकाने ठोकल्या बेड्या


प्रशांत चंदनखेडे वणी 

महागड्या अमली पदार्थाची नशा करणारे शौकीनही शहरात वाढले असल्याचे एका एमडी ड्रग्ज विक्रेत्यावर झालेल्या कार्यवाही वरून समोर आले आहे. शहरातील जत्रा मैदान परिसरातील खुल्या जागेवर एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणाला एलसीबी पथकाने अटक केली आहे. त्याच्या जवळून २.२८० ग्राम एमडी ड्रग्ज किंमत ११ हजार ४०० रुपये या अमली पदार्थासह आयफोन व पल्सर मोटारसायकल असा एकूण ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी पथकाने जप्त केला आहे. तसेच क्षितिज अशोक इंगळे (२३) रा. रंगनाथ नगर या ड्रग्ज विक्रेत्या तरुणाला अटक करून त्याच्यासह इतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही ३० मे ला मध्यरात्री करण्यात आली. 

शहरातील जत्रा मैदान परिसरात सार्वजनिक खुल्या जागेवर अमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. या माहिती वरून एलसीबी पथक खाजगी वाहनाने जत्रा मैदान येथे पोहचले. कुणाला जराही सुगावा लागू नये म्हणून पथकाने वाहन दूर अनंतरवर उभे केले. नंतर अमली पदार्थ विक्रेत्याचा शोध घेत एलसीबी पथक अंधारात पायी चालत असतांना त्यांना एक तरुण मोटसायकलवर बसून दिसला. पथकाने त्याच्या जवळ जाऊन त्याला त्याचे नाव विचारले. तसेच एवढ्या रात्री येथे कशासाठी थांबला आहे, असे विचारले असता त्याची बोबडीच वळली. 

त्यामुळे एलसीबी पथकाने पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली. अंगझडतीत त्याच्या पॅन्टच्या मागच्या खिशात पथकाला एका प्लास्टिक पन्नीत पांढऱ्या रंगाचा पावडर आढळून आला. या पावडर बाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने तो एमडी ड्रग्ज हा महागडा अमली पदार्थ असल्याचे सांगितले. ५ हजार रुपये ग्राम प्रमाणे हा एमडी पावडर विक्री होत असून अमली पदार्थाची महागडी नशा करणारे शौकीन एमडी ड्रग्ज खरेदी करीत असल्याचे पथकाच्या चौकशीत पुढे आले.

एलसीबी पथकाने क्षितिज इंगळे या ड्रग्ज विक्रेत्या तरुणाजवळून २.२८० ग्राम एमडी पावडर किंमत ११ हजार ४०० रुपये, एक आयफोन किंमत २५ हजार रुपये व पल्सर (२०० सीसी) मोटारसायल (MH ३४ BK १८४३) किंमत ७५ हजार रुपये असा एकूण ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. क्षितिज इंगळे याने अंकित कडू रा. नागपूर याच्या मार्फत प्रतिक नामक व्यक्ती कडून ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिल्याने पथकाने क्षितिज इंगळे याच्यासह तीन आरोपींवर ड्रग्ज प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ (c), २१ (b), २९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही एलसीबी पथकाचे धनराज हाके, सुनिल खंडागडे, सुधिर पांडे, उल्हास कुरकुटे, सुधिर पिदूरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख यांनी केली. पुढील तपास सपोनि धनंजय रत्नपारखी करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.