प्रशांत चंदनखेडे वणी
दुचाकी स्लिप होऊन दुभाजकावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. १० मे ला रात्री ९ वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या जिनिंग जवळ घडली. नकुल अरुणकुमार रहांगडाले (३४) रा. पटवारी कॉलनी, लालगुडा असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
लालगुडा येथे व्यसनमुक्ती केंद्र चालविणारा नकुल रहांगडाले हा युवक मूळचा चंद्रपूर येथील रहिवाशी असल्याचे समजते. तो पटवारी कॉलनी येथे किरायाच्या इमारतीत व्यसनमुक्ती केंद्र चालवीत होता. शनिवारला रात्री तो दुचाकीने वणी घुग्गुस मार्गाने पटवारी कॉलनी (लालगुडा) येथील व्यसनमुक्ती केंद्राकडे जात असतांना त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व दुचाकी महामार्गावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात नकुल हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर येथे हलविण्यात आले. चंद्रपूर येथे उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतक नकुल हा विवाहित असून त्याला ३ वर्षाची एक मुलगी आहे. त्याचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले तर कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments: