प्रशांत चंदनखेडे वणी
एसटी महामंडळाच्या वणी आगाराला नवीन ५ बसेस मिळाल्याने त्याचा लोकार्पण सोहळा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नवीन लालपरी बसेसचे लोकार्पण आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यातच नवीन बसेसचे लोकार्पण करतांना आमदार संजय देरकर यांनी स्वतः एसटी बस चालवून एसटी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. मात्र आमदारांनी जड वाहन चालविण्याचा कुठलाही अनुभव नसतांना एसटी बस चालवून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी थेट महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे केली. यावरून आजी माजी आमदारांमध्ये अजूनही खलबत्ते सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुका संपल्या पण त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं राजकारण मात्र अजूनच गडद होतांना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही त्यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अशाच झडत राहतील, या चर्चेने शहरात रान उठलं आहे.
वणी आगाराला नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र संजय देरकर हे आमदार झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. तसेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देखील वणी आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी केली होती. आमदारांनी वणी आगाराला नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी रेटून धरत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्री महोदयांनी वणी आगाराला १० एसटी बसेस देण्याचे मान्य केले. त्यानुसार ५ नवीन बसेस वणी एसटी आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्या. तर ५ बसेस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
वणी आगाराला मिळालेल्या ५ नवीन एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संजय देरकर यांनी नवीन एसटी बसेसचे लोकार्पण करतांनाच एसटी कर्मचाऱ्यांच्या उत्साहापोटी स्वतः एसटी बस चालविली. यावरून नंतर चांगलंच रान पेटलं. माजी आमदारांनी हा मुद्दा उचलून धरत आमदार संजय देरकर यांची राज्य परिवहन मंत्र्यांकडे तक्रार केली. त्यामुळे आजी माजी आमदारांमधील आरोप प्रत्यारोपांचं राजकारण अधिकच गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवीन एसटी बसेसचे लोकार्पण करतांना एसटी बस चालविली यात गैर काय : आमदार संजय देरकर
वणी आगारात नवीन एसटी बसेस दाखल झाल्यानंतर आमदार संजय देरकर यांना लोकार्पण सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आमदारांच्या हस्ते नवीन एसटी बसेसचे लोकार्पण करण्यात आले. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आमदारांनी स्वतः एसटी बस चालविली. यावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की, याआधीही मंत्री व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात नवीन एसटी बसेसचे लोकार्पण करतांना बस चालविल्या आहेत. त्यामुळे मी बस चालविली याला राजकीय मुद्दा बनविण्याची गरज नव्हती. बस चालविता येत होती म्हणूनच चालविली, नाही तर बस चालविण्याचा धोका पत्करला नसता. आमदारांनी बस चालविली म्हणून तळतळाट न होऊ देता वणी आगाराला नवीन बसेस मिळाल्या यावर समाधान व्यक्त करणं गरजेचं होतं. परंतु निवडणुकीच्या निकालामुळे अजूनही पोटशुळ उठतच असल्याचं दिसून येत आहे. मात्र नवीन एसटी बसेसचे लोकार्पण करतांना मी बस चालविली यात मला काहीही गैर वाटत नाही. आणि अशा आरोपांवर भाष्य करण्याचीही मला गरज वाटत नाही
No comments: