Latest News

Latest News
Loading...

शिवसेनेच्या (उबाठा) हल्लाबोल आंदोलनानं कंपनी प्रशासन आलं वठणीवर, आठ दिवसांत भूमिपुत्रांना रोजगार देण्याची दिली हमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलिशी अधिनस्त असलेल्या सिडेक्स व जीआरएन या ओबी कंपन्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य न देता परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणात भरणा करण्यात आल्याने शिवसेनेकडून (उबाठा) सोमवार दि. १२ मे ला या दोन्ही कंपन्यांविरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या कंपन्यांच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करून कंपन्यांचे काम बंद पाडण्यात आल्याने कंपनी प्रशासन व वेकोलि अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. आणि आठ दिवसांत भूमिपुत्रांना कंपनीत रोजगार देण्याची हमी दिली. आठ दिवसांत जर कंपनीने भूमिपुत्रांना रोजगार दिला नाही तर सरळ कोळसाखाणीचेच काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेकडून (उबाठा) देण्यात आला आहे. 

कोळसाखाणींनी वेढलेल्या वणी तालुक्यात कोळसाखाणींशी संलग्न असलेल्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. कोळसाखाणींचा विस्तार करणाकरिता या कंपन्यांना वेकोलि कडून कंत्राट देण्यात आलं आहे. भूगर्भाच्या खोलात जाऊन कोळसा बाहेर काढण्याचं काम या कंपन्या करतात. या कंपन्या शासन मान्यताप्राप्त आहेत. भूगर्भातील कोळसा बाहेर काढून कोळसाखाणींचे उत्पादन वाढविण्याकरिता या कंपन्यांना अनेक वर्षांचं कंत्राट मिळालं आहे. या कंपन्यांमध्ये व्होल्वो वाहन चालक, मशीन ऑपरेटर, मेकॅनिकल व इतर असे शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र कंपनी प्रशासनाने भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय व परजिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात कंपनीत सामावून घेतले आहे. कोळसाखाणींमुळे निर्माण होणारे प्रदूषण व समस्या येथील रहिवाशी झेलतात. आणि रोजगार मात्र बाहेरील लोकांना दिला जातो. 

कोळशावर आधारित उद्योग व कंपन्यांमध्ये स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल अशी अपेक्षा असतांना कंपन्यांकडून स्थानिकांवर अन्याय केला जात आहे. आणि हा अन्याय शिवसेना (उबाठा) कदापिही खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देतानाच आज शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत कंपन्यांच्या प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल आंदोलन केले. शिवसेनेने कंपन्यांचं कामकाजचं बंद पाडलं. त्यामुळे कंपनी प्रशासन धाऱ्यावर आलं. आणि भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देण्याची कबुली दिली. शिवसेनेकडून सिडेक्स व जीआरएन या दोन्ही कंपन्यांना आठ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. आठ दिवसांत भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून न दिल्यास सरळ कोळसाखाणीचेच काम बंद पडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला आहे. 

वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या हल्लाबोल आंदोलनात बेलोरा, निलजई, पुनवट, तरोडा, सुंदरनगर, लाठी बेसा, भालर येथील बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. कोळसाखाणीलगत असलेल्या गावातील युवकांना प्रथम प्राधान्य देण्याऐवजी कंपनी प्रशासन या युवकांना हुलकावणी देत होतं. त्यामुळे येथील बेरोजगारांच्या प्रश्नांना घेऊन शिवसेना प्रचंड आक्रमक झाली. शिवसेनेने कंपनी प्रशासनाची सुज्ञ ठिकाणावर आणली. त्यामुळे कंपनी प्रशासन सूताप्रमाणे सरळ झालं, व भूमिपुत्रांना रोजगार देण्याचं मान्य केलं. 

या आंदोलनात शिवसेनेचे (उबाठा) प्रशांत पाचभाई, विनोद ढुमणे, आनंद घोटेकर, संजय देठे, अभय चौधरी, तुळशीराम मस्की, करण किंगरे, दिवाकर भोंगळे, सतीश वऱ्हाटे, शत्रुघ्न मालेकर, महेश सोमलकर, पुरुषोत्तम बुत्ते, संभा मते, रवी पोटे, सोमेश्वर गेडेकर,  थेरे पाटील, स्मिता गोवारदिपे (उपसरपंच ग्रामपंचायत तरोडा), माजी सरपंच वैष्णवी वराटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

No comments:

Powered by Blogger.