Latest News

Latest News
Loading...

कार अंगावर आणून डोळ्यादेखत नेले अल्पवयीन मुलीला पळवून

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील खडबडा मोहल्ला येथील तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. आईच्या तक्रारी वरून पोलिसांनी बालिकेला पळवून नेणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या महिलेला तीन मुली आहेत. त्यापैकी मोठी मुलगी १४ वर्षाची आहे. ती मागील चार वर्षांपासून आजीकडे राहते व नागपूर येथील मदरसा येथे शिक्षण घेते. शाळेला सुट्या लागल्याने ती वणी येथे आपल्या आई वडिलांकडे आली होती. २० मे ला मुलीची आई नागपूर येथे आपल्या आईकडे काही कामानिमित्त गेली होती. सायंकाळी ६ वाजता ती नागपूर वरून घरी परल्यानंतर तिला मुलगी ही घरी दिसली नाही. मुलीचा मोबाईलही बंद येत होता. त्यामुळे मुलीच्या आईने तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अशातच मुलीच्या आईला तिच्या भावाचा फोन आला व मुलगी ही खडबडा मोहल्ला येथील रहिवाशी असलेल्या तरुणासोबत असल्याचे सांगितले. त्या दोघांसोबत त्याच्या ओळखीतील एक तरुणही असल्याचे त्याने आपल्या बहिणीला सांगितले. त्या दोघांसोबत असलेल्या तरुणाने नांदेपेरा रोड वरील शाळा क्रमांक ५ जवळील लोकेशन पाठविल्यानंतर मुलीचा मामा व त्याचा मित्र तेथे गेले असता त्याची भाची व खडबडा मोहल्ला येथील तरुण एका चार चाकी गाडीत त्यांना आढळून आले. सोबत माहिती देणारा त्याचा मित्रही होता. 

मुलीचा मामा समोर दिसताच तरुणाने मामा व त्याच्या मित्राच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न केला. आणि काही अंतरावर कार थांबवून त्याने मुलीला पळवून नेले. तरुणाने चक्क मामाच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न करून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याने मुलीची आई व तिचा मामा चांगलेच धास्तीत आले. कुटुंबीयांचा जीव घेण्यास मागे पुढे न बघता त्यांच्या डोळ्यासमोर अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याइतपत तरुणांच्या हिमती वाढल्याने त्यांना कायद्याचा जराही धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या गंभीर प्रकारानंतर मुलीच्या आईने शीघ्र पोलिस स्टेशन गाठून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविली. मुलीच्या आईच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा व मुलीचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.   

No comments:

Powered by Blogger.