प्रशांत चंदनखेडे वणी
तिकिटाच्या पैशावरून एका प्रवासी महिलेने एसटी महामंडळातील महिला वाहकाशी वाद घालून थापडा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २० मे ला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर एसटी बस व वणी बसस्थानकावर घडली. याबाबत महिला वाहकाने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी लोकसेवकाला आपले कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त केल्याप्रकरणी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सदाशिवनगर येथे वास्तव्यास असलेली कु. वर्षा प्रभाकर सिडाम (३५) ही एसटी महामंडळाच्या वणी आगारात वाहक म्हणून कार्यरत आहे. २० मे ला वणी-चंद्रपूर बसवर कर्तव्य बजावत असतांना एका महिलेने तिकिटाच्या पैशावरून तिच्याशी वाद घालून थापडा बुक्क्यांनी मारहाण केली. वर्षा सिडाम ही दुपारी ३.३० वाजता वणी चंद्रपूर बसवर (MH ४० AQ ६०९२) वाहक म्हणून कर्तव्य बजावत होती. ही बस चंद्रपूरला पोहचल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता वणीच्या प्रवासाला निघाली. चंद्रपूर वरून प्रवासी घेऊन निघालेल्या या एसटी बसमध्ये चंद्रपूर येथून एक महिला प्रवासी देखील बसली. तिला वणीला यायचे होते. पण एसटी बसच्या महिला कंडक्टरने चुकीने तिला वरोऱ्याचे तिकीट दिले. नंतर कंडक्टरला आपली चुक लक्षात आली आणि तिने या प्रवासी महिलेला वरोऱ्यावरून वणीचे तिकीट दिले. मात्र ही महिला तिकिटाचे पैसे द्यायला तयार नव्हती. तुम्ही बस कंडक्टर प्रवाशांना खूप लुटता असे म्हणत ती महिला वाहक वर्षा सिडाम हिच्याशी वाद घालू लागली. नंतर तिने महिला कंडक्टरला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
ही प्रवासी महिला एवढ्यावरच थांबली नाही तर शिव्या कशाला देते असा जाब विचारणाऱ्या महिला वाहकालाच तिने थापड बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. बस वणी येथे पोहचल्यानंतर चालकाने सरळ बस वणी पोलिस स्टेशनला आणली. मात्र बस पोलिस स्टेशन येथे आणण्यापूर्वीच बस मधील प्रवाशी उतरून निघून गेले होते. महिला वाहक वर्षा सिडाम हिने घडलेली घटना पोलिसांना सांगतांनाच आरोपी प्रवासी महिलेविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. कु. वर्षा सिडाम या महिला वाहकाच्या तक्रारी वरून पोलिसांनी लोकसेवकाला आपले कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त केल्याप्रकरणी आरोपी प्रवासी महिला काजल गोविंद डवरे रा. राजूर (कॉ.) ता. वणी हिच्यावर बीएनएसच्या कलम १३२, १२१(१), ३५२, ३५१(२), ३५१ (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: