Latest News

Latest News
Loading...

अवकाळी पावसाची शहरात धुंवाधार बॅटिंग, उन्हाळ्यात आला पावसाळी वातावरणाचा अनुभव

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

भर उन्हाळ्यात धो-धो पाऊस पडू लागल्याने निसर्गचक्र बदलले की काय, हा संभ्रम निर्माण झाला आहे. निसर्गातील हा बदल थक्क करणारा आहे. ऋतूंनी कूस बदल्यागत वातावरण बदललं आहे. उन्हाळ्यातच पावसाळा सुरु झाल्यासारखं वाटायला लागलं आहे. मे हॉटमध्ये कुल वातावरण निर्माण झालं आहे. शहराला आज परत अवकाळी पावसानं झोडपलं. मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. ढगातून तीव्र स्वरूपाच्या जलधारा कोसळल्या. विजेच्या कडकडाटांसह धो-धो पाऊस बरसला. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाल्याने भरदुपारी सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. उकाड्यानं त्रांगलेल्या जीवांना थंड वातावरणाची झुळूक अनुभवायला मिळाली. धुंवाधार बरसलेल्या पावसाने तापमानाचा पारा घसरला आणि गर्मीत थंड वातावरणाचा अनुभव आला. 

निसर्गाचं चक्र बदललं की काय, असं वाटायला लागलं आहे. भर उन्हाळ्यात पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. दुपारनंतर अचानक वातारण बदलतं. नभात ढग दाटून येतात. वारे जोरजोरात वाहायला लागतात. दुपार नंतर कधी कधी पावसाळी वातावरणाचा अनुभव येतो. उष्णतेने जीव कासावीस झालेला असतांना आज २१ मे ला दुपारी २.३० वाजता वरूण राजा मनसोक्त बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. वातावरणात अचानक बदल झाल्याने शहरवासीयांनी घराचा रस्ता धरला. पण बाहेर गाव वरून आलेल्या नागकांची चांगलीच धावपळ झाली. आकाशात ढग दाटून आल्यानंतर क्षणात विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे रस्त्यांनी मार्गक्रमण करणाऱ्या व बाजारपेठेतील नागरिकांचा प्रचंड गोंधळ उडाला. नागरिक मिळेल तेथे आसरा घेण्याचा प्रयत्न करू लागले. दोन ते तीन तास जोरदार बरसला तर अजूनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. 

शेतकऱ्यांची सध्या मान्सून पूर्वीची कामे सुरु आहेत. शेतीच्या मशागतीत शेतकरी व्यस्त झाला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतकरी शेतीच्या मशागतीची पूर्ण कामे आटपतो. परंतु अवकाळी पाऊस शेतीच्या माशागतीत व्यत्यय आणू लागल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातल्या त्यात उन्हाळा म्हणजे लग्नसराईचा काळ. उन्हाळ्यात तरुण मुलामुलींची मोठ्या प्रमाणात लग्न आटोपली जातात. शहरात लग्न सोहळ्यांची धूम सुरु आहे. रस्त्यांनी वाद्यांच्या तालावर बेधुंद थिरकणाऱ्या लग्न वराती पाहायला मिळत आहेत. आजही शहरात बरेच लग्न सोहळे होते. पण अचानक पावसाने आपली धून वाजविल्याने लग्न वरातीच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले. पावसाच्या तालामुळे लग्न वरातीच्या वाद्यांचा सूर बिघडला. लग्न सोहळ्यांच्या आनंदावर विरजण आणण्याचं काम पाऊस करू लागला आहे. उन्हाळ्याचे दिवस असले तरी पाऊस कधी येईल याची आता शाश्वतीच राहिली नाही. पावसाळ्याची सुरवात व्हावी असा धुंवाधार पाऊस आज बरसला. त्यामुळे पाऊस कधी येईल व वीज कधी जाईल याचा आता नेमच राहिला नसल्याची चर्चा आज शहरात रंगली होती.  

No comments:

Powered by Blogger.