प्रशांत चंदनखेडे वणी
पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करून निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा व दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याकरिता भारतीय लष्कराने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल सैनिकांचे मनोबल व सन्मान वाढविण्याकरिता शहरात तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. २२ मे ला दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून हि तिरंगा यात्रा निघणार आहे. सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वरीत्या पार पाडल्याने त्यांच्या सन्मानार्थ काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेत राष्ट्रभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोकांनी केले आहे.
दहशतवाद्यांनी पहलगाम येथील पर्यटकांवर गोळ्या चालविल्या. पर्यटनासाठी आलेल्या २६ निष्पाप जीवांचे बळी घेतले. दहशतवाद्यांच्या या क्रूर कृत्यामुळे देशात संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशातून तीव्र निषेध करण्यात आला. निर्दयीपणे गोळ्या चालवून निष्पाप जीवांचे बळी घेण्यात आल्याने देशभवना प्रचंड दुखावली. त्यामुळे दशतवादी संघटनांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्याचा निर्धार करून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबविले. दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याकरिता राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पाकिस्तान हद्दीतील अतिरेकी अड्ड्यांवर भारतीय सैन्यांनी क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करून पाकिस्तानातील अतिरेकी अड्डे उध्वस्त केले. तसेच पाकिस्तनचे सर्व पलटवारही उधळून लावले. पाकिस्तानी सैनिकांनी केलेले हल्ले देखील परतवून लावले. पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त करून पाकिस्तानला चारही मुंड्या चित करणाऱ्या भारतीय सैन्याने अभिमानास्पद कामगिरी केली. भारतीय सैन्याने दाखविलेल्या पराक्रमाने साऱ्या जगाला अचंबित केले.
भारतीय सैनिकांच्या शौर्याचा अभिमान व गौरव म्हणून त्यांच्या सन्मानार्थ वणी शहरातून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून निघणारी ही तिरंगा यात्रा खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, काठेड ऑईल मिल, सुभाषचंद्र बोस चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी निघून परत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचल्यानंतर या तिरंगा यात्रेचा समारोप होईल. सैनिकांप्रती सन्मान व राष्ट्रभक्तीचा हुंकार भरण्याकरिता या तिरंगा यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments: