प्रशांत चंदनखेडे वणी
महापुरुषांच्या विचारांचा वारसा व वैचारिक प्रबोधनाची चळवळ पुढे नेण्याचा काही धेय्यवादी आंबेडकरी संघटना पोटतिडकीने प्रयत्न करीत आहेत. महापुरुषांच्या कार्याची प्रामाणिकपणे धुरा वाहणाऱ्या आंबेडकरी संघटनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणी या संघटनेचं नाव प्रकर्षाने पुढे येतं. या संघटनेने अलीकडच्या काळात महापुरुषांच्या विचारांचं वादळ निर्माण करणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले. व्याख्यान व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर केला. सामाजिक जागृती करीता अभिप्रेत असलेले कार्यक्रम आयोजित करण्याकरिता हा विचारमंच प्रकर्षाने पुढाकार घेतो. महापुरुषांच्या वैचारिक दृष्टिकोन व मानवी नितिमत्तेपासून भरकट चाललेल्या समाजाला प्रबुद्ध विचारांकडे वळविण्याचा विडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचने उचलला आहे. प्रख्यात विचारवंत व व्याख्यानकार यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांनी तसेच प्रबोधनकारांच्या प्रबोधनातुन समाजाला योग्य दिशा दाखविण्याचं काम आंबेडकरी विचारमंच सातत्याने करीत आहे.
अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच द्वारा २३ मे ला सायंकाळी ६ वाजता शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जाहीर व्याख्यान व कबीर वाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत विनय बोधीप्रिय महाथेरो (नांदेड) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बौद्ध धम्म आणि आपली जबाबदारी या विषयावर उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तसेच पवन भगत व डॉ. भावना भगत आणि त्यांचा संच (बल्लारपूर) कबीर वाणी हा प्रबोधनपर कार्यक्रम सादर करणार आहेत. व्याख्यानातून समाजाची विचारशक्ती प्रबळ व्हावी व जगण्याला वास्तविकतेचे संदर्भ मिळावे या उद्देशाने भदंत विनय बोधीप्रिय महाथेरो यांचं जाहीर व्यख्यान आयोजित करण्यात आलं आहे. तर आपल्या दोह्यातून अंधविश्वासावर प्रखरतेने प्रहार करून सत्य आणि ज्ञानाच्या मार्गाने वास्तववादी जीवनाचा सार सांगणाऱ्या संत कबीरांची वाणी जशीच्या तशी या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे. महापुरुषांच्या विचारधारेला अनुसरून असलेल्या या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments: