प्रशांत चंदनखेडे वणी
सलून व्यावसायिक असलेला युवक अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबं प्रचंड काळजीत आलं आहे. १३ मे ला दुपारी ४ वाजता पासून त्याचा मोबाईल बंद येऊ लागल्याने कुटुंबं चांगलंच धास्तीत आलं आहे. त्याची नातेवाईक व मित्रमंडळींकडे चौकशी केल्यानंतर वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांकडून युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. महादेव कवडूजी तेजे (३२) रा. माळीपुरा वणी असे या बेपत्ता युवकाचे नाव आहे.
महादेव तेजे या युवकाने स्मृती टॉकीज जवळील एका सलून दुकानात कारागीर म्हणून काम केल्यानंतर त्याने बसस्थानकाजवळ आपले स्वतःचे सलून उघडले. स्वतःचे सलून दुकान सुरु केल्यानंतर सगळं काही व्यवस्थित सुरु असतांना अचानक तो बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. महादेव हा मुळचा वणी तालुक्यातील गोडगाव येथील रहिवाशी असून तो शहरातील माळीपुरा येथे किरायाने राहत होता. त्याचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले, की लग्न जुळले होते, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. १३ मे ला दुपारी ४ वाजता वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला असता त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे वडिलांनी वणी येथे येऊन तो किरायाने राहत असलेल्या घरी जाऊन पाहणी केली. मात्र तो तेथे आढळून आला नाही. त्याची मोटारसायकल मात्र रूमवरच होती.
त्यानंतर वडिलांनी त्याच्या मित्रांना फोन करून त्याची विचारपूस केली असता मित्रांनी सकाळी तो सलून दुकानात आल्याचे सांगितले. त्यानंतर तो दुपारी आराम करतो म्हणून रूमवर गेला. पण नंतर तो सलूनमध्ये आलाच नसल्याची माहिती मित्रांकडून मिळाली. वडिलांनी त्याचा शक्य तेथे सगळीकडे शोध घेतल्यानंतर शेवटी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. कवडू दामोदर तेजे (५६) रा. गोडगाव ता. वणी यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी बेपत्ता युवकाचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. हा युवक कुठे आढळल्यास किंवा या युवकाबाबत कुठलीही माहिती मिळाल्यास पोलिस शिपाई सचिन मरकाम (8329872169) यांच्याशी संपर्क साधावा.
No comments: